देशात दरवर्षी विद्यापीठीय रॅंकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या जवाहरलाल विद्यापीठात रविवारी झालेल्या हाणामारीबाबत विद्यापीठ प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. कॅम्पसमधील हिंसाचार (Violence) अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे प्रशासनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, प्रशासनाने म्हटले आहे की, 'आम्ही पुन्हा एकदा सांगतो की, कॅम्पसमधील कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही.' विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांना (Student) शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. कावेरी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचे जेएनयू प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. घटनेची दखल घेत कुलगुरु, रेक्टर आणि इतर अधिकारी वसतिगृहात पोहोचले आणि तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली.
दरम्यान, कुलगुरुंनी तिथे उपस्थित वॉर्डनना या प्रकरणी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहेत. त्याचबरोबर यापुढे अशा प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. कॅम्पसमधील सुरक्षेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून अशी कोणतीही घटना घडल्यास तात्काळ जेएनयू प्रशासनाला कळवण्यासही सांगण्यात आले आहे. कोणताही विद्यार्थी हिंसाचार, उपद्रव अशा कृत्यांमध्ये गुंतलेला आढळून आल्यास त्याच्यावर विद्यापीठाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीमध्ये म्हटले आहे.
शिक्षक संघानेही निवेदन दिले
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) शिक्षक संघटनेनेही याप्रकरणी निवेदन जारी केले आहे. कावेरी वसतिगृहातील 'मेस' मधील हाणामारीचा शिक्षक संघाने निषेध केला आहे. त्याचबरोबर या याप्रकरणी कुलगुरुंच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जेएनयूटीएने रविवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही घडलेल्या प्रकाराची चौकशी करत आहोत. तसेच तथ्यात्मक तपशीलही गोळा करण्यात येत आहे.
याशिवाय, रविवारी कावेरी वसतिगृहात मांसाहार बंद करण्यासाठी हिंसाचार झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार करण्यापासून रोखले. त्यानंतर तिथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.