

लखनौ: उत्तर प्रदेशात काल दिवसभर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे १०० जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मदत आयुक्तांच्या कार्यालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडली. अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बाधित कुटुंबांना २४ तासांच्या आत मदत पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मदत आयुक्तांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.१३) झालेल्या वादळ, पाऊस, गारपीट आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये ९७ जणांचा मृत्यू झाला तर ५३ जण जखमी झाले आहेत. याशिवाय ११४ जनावरांचा मृत्यू झाला असून ८७ घरांचे नुकसान झाले आहे.
जखमींवर तातडीने मोफत आणि योग्य उपचार करावेत. तसेच मृतांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावेत. कार्यकर्त्यांनी संकटग्रस्त लोकांना शक्य ती सर्व मदत करावी.
- अखिलेश यादव,अध्यक्ष,‘सप’
युवक पत्र्यासह उडाला
बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती वादळामुळे पत्र्याच्या शेडसह हवेत उंच उडाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीचे नाव नन्हे असे असून, उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बरेलीतील बमियाना गावात घडली आहे.
‘त्वरित सर्वेक्षण करावे’
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महसूल आणि कृषी विभागासह विमा कंपन्यांना नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.