

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. सिडनी (SCG) येथील एशेज मालिकेतील शेवटचा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरेल. मात्र, निवृत्तीच्या घोषणेवेळी ख्वाजाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील व्यवस्था आणि मानसिकतेवर केलेले आरोप अधिक धक्कादायक आहेत. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ पाकिस्तानी वंशाचा आणि मुस्लिम असल्याने आपल्याला दुजाभाव सहन करावा लागला, असा खळबळजनक खुलासा त्याने केला आहे.
ख्वाजा म्हणाला की, संपूर्ण करिअरमध्ये त्याला त्याच्या मूळ ओळखीमुळे वेगळ्या नजरेने पाहिले गेले. क्रिकेटच्या संपूर्ण कारकिर्दीत मला पाकिस्तानी असल्यामुळे आणि मुस्लिम ओळखीमुळे वेगळ्या नजरेने पाहिलं गेलं. ज्या ज्या वेळी मी खराब फॉर्ममध्ये होता किंवा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा मला 'आळशी' आणि 'स्वार्थी' असे संबोधले गेले जायचे. पाकिस्तानी किंवा वेस्ट इंडीजच्या वंशाच्या खेळाडूंना अनेकदा संघहिताची पर्वा न करणारे म्हणून लेबल लावले जाते, जे अत्यंत चुकीचे आहे.
ख्वाजाने आपल्यावर झालेल्या अन्यायाचे उदाहरण देताना सांगितले की, पर्थ कसोटीपूर्वी गोल्फ खेळल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. "अनेक खेळाडू सामन्यापूर्वी १५-१५ बीयर पितात किंवा गोल्फ खेळताना जखमी होतात, तेव्हा मीडिया गप्प राहते. पण माझ्या बाबतीत माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले गेले." ख्वाजाच्या मते, जेव्हा तो जखमी होता तेव्हा सलग ५ दिवस त्याच्यावर मीडियातून तुटून पडले गेले, जे केवळ एका ठराविक विचारसरणीचा भाग होते.
ख्वाजासोबत पत्नी रेचल आणि मुलं या पत्रकार परिषदेत उपस्थित होती. त्याने सांगितले की, एडिलेड कसोटीच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान न मिळणे हा त्याच्यासाठी मोठा संकेत होता. जरी नंतर स्टीव्ह स्मिथच्या आजारपणामुळे त्याला संधी मिळाली आणि त्याने ८२ धावांची खेळी केली, तरीही आपला स्वाभिमान जपण्यासाठी त्याने निवृत्तीचा मार्ग निवडला. प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी त्याला २०२७ च्या भारत दौऱ्यापर्यंत खेळण्याची गळ घातली होती, मात्र "लोकांनी मला स्वार्थी म्हणू नये," यासाठी ख्वाजा आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
उस्मान ख्वाजाने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत ८७ कसोटी सामन्यांमध्ये ४३ च्या सरासरीने ६२०६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १६ शतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने ४० एकदिवसीय सामनेही खेळले असून त्यात १५५४ धावा केल्या आहेत. मात्र, २०१९ नंतर त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळाली नव्हती. ख्वाजाने इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एका पर्वाचा अंत झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले तरी ख्वाजा 'बिग बॅश लीग'मध्ये ब्रिस्बेन हीटसाठी खेळत राहणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी ख्वाजाचे कौतुक करताना म्हटले की, "उस्मानने मैदानावर आणि मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला खूप काही दिले आहे, त्याचे योगदान कायम स्मरणात राहील." मात्र, ख्वाजाने उपस्थित केलेले वांशिक भेदभावाचे मुद्दे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डासाठी चिंतेची बाब ठरणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.