

मुंबई: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’द्वारे नोव्हेंबरमध्ये झालेल्या व्यवहारांची संख्या मासिक तुलनेत एक टक्क्याने, तर व्यवहारमूल्य ३.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. या महिन्यात सुमारे २६.३२ लाख कोटी रुपये मूल्याचे २०.४७ अब्ज व्यवहार झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये व्यवहारांची संख्या आणि मूल्य दोन्ही बाबतीत आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला होता.
उत्सवाच्या हंगामामुळे आणि जीएसटी २.० सवलतींमुळे ऑक्टोबरमध्ये २७.२८ लाख कोटी रुपयांचे २०.७ अब्ज व्यवहार झाले होते. नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत, नोव्हेंबर २०२५ मध्ये व्यवहारांच्या संख्येत ३२ टक्के आणि मूल्यात २२ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये १९.६३ अब्ज व्यवहार झाले होते आणि मूल्य २४.९ लाख कोटी रुपये होते. ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी व्यवहार ६६.८ कोटी होते, ते नोव्हेंबरमध्ये ६८.२ कोटी झाले.
नोव्हेंबरमध्ये इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण ऑक्टोबरमधील ४०.४ कोटींवरून ८.६ टक्क्यांनी कमी होऊन ३६.९ कोटीवर आले आहेत. मूल्याच्या बाबतीतही या व्यवहारांचे मूल्य ऑक्टोबरमधील ६.४३ लाख कोटी रुपयांवरून चार टक्क्यांनी कमी होऊन नोव्हेंबरमध्ये ६.१५ लाख कोटी रुपयांवर आले.
नोव्हेंबरमध्ये फास्टटॅग व्यवहार २.२ टक्क्यांनी वाढून ३६.९ कोटी झाले. ऑक्टोबरमध्ये ते ३६.१ कोटी होते. या व्यवहारांचे एकूण मूल्य ऑक्टोबरमधील ६,६८६ कोटी रुपयांच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढून ७,०४६ कोटी रुपये झाले. नोव्हेंबरमध्ये, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) व्यवहारांचे प्रमाण ऑक्टोबरमधील ११.२ कोटींवरून ३.६ टक्क्यांनी कमी होऊन १०.८ कोटी झाले. या व्यवहारांचे मूल्य ऑक्टोबरमधील ३०,५०९ कोटी रुपयांच्या तुलनेत २८,४२८ कोटी रुपये झाले.
मोठ्या रकमेच्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढत असून, सरासरी दैनिक व्यवहारांची संख्या ऑक्टोबर, नोव्हेंबरसाठी ६६ ते ६८ कोटीच्या श्रेणीत आहे यावरून मोठ्या प्रमाणात विश्वासार्हता प्रदान करण्याची ‘यूपीआय’ची क्षमता अधोरेखित होते. ‘यूपीआय’ची स्थिर कामगिरी भारताच्या रोखविरहित अर्थव्यवस्थेचा पायाभूत आधारस्तंभ म्हणून त्याची भूमिका अधोरेखित करते.
- रामकृष्णन रामामूर्ती, मुख्य वितरण अधिकारी, वर्ल्डलाइन इंडिया
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.