Udaipur Tailor Murder Case: राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीटवर दोन जिहादींनी मंगळवारी टेलर कन्हैयालाल साहूची भरदिवसा हत्या केली. कन्हैयालाल यांचा दोष एवढाच होता की, त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यामुळे कट्टरतावादी संतापले होते. त्यानंतर कन्हैयालालला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या होत्या. मंगळवारी दोन धर्मांध कन्हैयालाल यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार तलवारीने वार केले. (Udaipur Ttailor Murder Case Chronology Of Udaipur Hindu Tailor Murder Case)
संपूर्ण दुकान त्याच्या रक्ताने लाल झाले होते
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी टेलरच्या (कन्हैयालाल साहू) निर्घृण हत्येचा व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. टेलरची हत्या केल्यानंतर दोघेही आरोपी तेथून आरामात बाहेर आले आणि त्यांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी 'सर तन से जुडा'चा नारा देत आणखी एक व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी दिली. दुसरीकडे, हत्येनंतर टेलरचा मृतदेह बराच वेळ दुकानात पडून होता. संपूर्ण दुकान त्याच्या रक्ताने लाल झाले होते.
600 पोलीस उदयपूरला पोहोचले
पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर दोन्ही आरोपींना दुचाकीवरुन पळून जाताना पकडले. या निर्घृण हत्याकांडानंतर उदयपूरसह राजस्थानच्या (Rajasthan) अनेक भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या आदेशानुसार जयपूरहून उदयपूरला 600 पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
शहरात तणाव आणि संताप
उदयपूरमध्ये इस्लाम आणि जिहादच्या नावाखाली या हिंदू टेलरच्या हत्येमुळे गेहलोत सरकारबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी हत्येच्या निषेधार्थ मालदास स्ट्रीट परिसरातील दुकाने बंद ठेवली.
दोन्ही आरोपी पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्यात गजाआड टाकले आहे. यातील एकाचे नाव रियाझ मोहम्मद असून, तो भीलवाडा येथील असिंद भागातील रहिवासी असून गेल्या 10 वर्षांपासून उदयपूरमध्ये राहत आहे. गौस मोहम्मद असे अन्य आरोपीचे नाव आहे. तो उदयपूरच्या खांजीपार भागातील रहिवासी आहे.
याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करुन राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा मी निषेध करतो, असे ते म्हणाले. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपने गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला
दुसरीकडे, पैगंबर वादात एका हिंदू टेलरची हत्या केल्याप्रकरणी भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजप नेते आणि खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ''उदयपूरमधील या भ्याड घटनेला गेहलोत सरकार जबाबदार असून या सरकारने करौली दंगलीतील मुख्य दंगलखोरांना खुलेखाम सोडले. टोंकमध्ये मौलानाने हिंदूंचे गळे कापण्याची धमकी दिली होती, परंतु कारवाई झाली नाही. हा मारेकरी व्हिडिओ बनवून हत्याकांडाच्या धमक्याही देत राहिला, पण सरकार गप्प बसले.''
दुसरीकडे, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी ट्विट करत म्हटले की, ''निष्पाप तरुणाच्या निर्दयी हत्येने हे स्पष्ट झाले आहे की, राज्य सरकारच्या इशाऱ्यावर या हत्या होत आहेत. त्यामुळे राज्यात जातीय उन्माद आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुन्हेगार इतके बोलघेवडे आहेत की, त्यांनी पंतप्रधानांबद्दल हिंसक वक्तव्ये केली आहेत. या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करुन कठोरात कठोर शिक्षा द्यावी. त्याचबरोबर या घटनेमागील लोकांचाही पर्दाफाश करुन त्यांना अटक करावी.''
उदयपूरमधील टेलर खून प्रकरण समजून घ्या
पैगंबर विवाद प्रकरणात, टेलर कन्हैयालाल साहूच्या 8 वर्षीय मुलाने 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 18 जून रोजी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ टिप्पणी केली होती.18 जून रोजी कन्हैयालालच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटस टाकण्यात आले. ही पोस्ट टाकल्यापासून त्यांना धमक्या येत होत्या. मंगळवार, 28 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही आरोपी कन्हैयालाल यांच्या दुकानात आले. त्यांनी कन्हैयालालला सांगितले की, 'आम्हाला कपडे शिवायची आहेत.'
त्यानंतर, एका आरोपीचे माप घेऊन मागे वळताच दुसऱ्या आरोपीने कन्हैयालालवर लपवून ठेवलेल्या तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात ते खाली पडले. यानंतर आरोपीने तलवारीनेच त्यांचा गळा चिरला. या घटनेदरम्यान दुसरा आरोपी व्हिडीओ बनवून घटनेचे शूटिंग करत राहिला. खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तेथून पोबारा केला. कन्हैयालाल यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. सध्या शहरात वातावरण तणावपूर्ण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.