

Supreme Court Ruling On Live In Relationship Breakup: सहमतीने निर्माण झालेल्या प्रेमाच्या आणि शारीरिक संबंधांनंतर जर दोन प्रौढ व्यक्तींमधील नाते तुटले, तर केवळ वेगळे झाल्याच्या कारणावरुन पूर्वीच्या संबंधांना 'बलात्कार' ठरवता येणार नाही, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडापीठाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या एका प्रकरणात सुनावणीदरम्यान ही स्पष्ट टिप्पणी केली. यासोबतच न्यायालयाने संबंधित आरोपी व्यक्तीची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
सध्याच्या काळात परस्पर संमतीने सुरु असलेले नाते संपल्यानंतर कायद्याचा आणि बलात्कारासारख्या गंभीर कलमांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर सुरुवातीपासूनच फसवणूक (Fraud) करण्याच्या हेतूने किंवा खोटे वचन देऊन संमती मिळवली गेली असेल, तर ती वेगळी बाब ठरु शकते. मात्र, परस्पर सहमतीने एकत्र राहिल्यानंतर नंतरच्या काळात नाते बिघडल्यामुळे किंवा मते जुळत नसल्याने ते तुटल्यास, आधीच्या सहमतीच्या संबंधांना सरसकट गुन्हा ठरवता येत नाही.
जर एखाद्या व्यक्तीला केवळ या भीतीपोटी नाते जबरदस्तीने सुरु ठेवावे लागत असेल की, वेगळे झाल्यास आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, तर ते त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासारखे आहे. नाते संपवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि केवळ वेगळे होण्याच्या निर्णयाला फसवणूक किंवा फ्रॉड म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले. याचबरोबर, बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा असून जिथे खरोखरच बळजबरी, हिंसा किंवा फसवणुकीचे स्पष्ट पुरावे असतील, तिथे कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.