Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात अय्यरला बरगडीला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला तात्काळ मैदान सोडावे लागले. त्याला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तपासणीत प्लीहामध्ये (Spleen) अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. या गंभीर दुखापतीनंतर अय्यरला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले, मात्र सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी (१ नोव्हेंबर) अधिकृत प्रेस रिलीज जारी करून अय्यरच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली. बोर्डाने स्पष्ट केले की अय्यरची प्रकृती आता स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे तात्काळ निदान करण्यात आले आणि एक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यात यश आले. त्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळाले असून तो आता स्थिर स्थितीत आहे. अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो जलद गतीने बरा होत आहे."
बोर्डाने या प्रसंगी सिडनीतील डॉक्टर कौरौश हाघीघी आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचे, तसेच भारतीय फिजिओ आणि डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांचे विशेष आभार मानले आहेत. अय्यर पुढील काही दिवस सिडनीमध्येच निरीक्षणाखाली राहणार असून प्रवासासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच भारतात परत येईल.
घटनेदरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स कॅरीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अय्यर मागे धावत असताना जमिनीवर पडला. धडक बसल्याने त्याच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागात फ्रॅक्चर झाले आणि प्लीहा फुटल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.
सद्यस्थितीत श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर आला असून त्याची तब्येत सुधारत आहे, परंतु वैद्यकीय तज्ञांच्या अंदाजानुसार त्याला पुन्हा क्रिकेट मैदानावर परतण्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

