
टीम इंडियाच्या क्रिकेटविश्वात सध्या सर्वांच्या नजरा दोन दिग्गज खेळाडूंवर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर खिळल्या आहेत. दोन्ही अनुभवी खेळाडू अलीकडच्या पुनरागमनात अपयशी ठरल्याने त्यांचे आगामी करिअर आणि विशेषतः २०२७ च्या विश्वचषकातील सहभाग यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अलीकडेच दिलेल्या संकेतांनुसार, रोहित आणि विराट पुढील दोन वर्षांनंतर भारतीय संघात कायम राहतीलच असे नाही. अशातच, माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी त्यांच्या दोघांच्या वय आणि तयारीबद्दल एक वादग्रस्त विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
अश्विन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना स्पष्ट शब्दांत म्हटले की, रोहित आणि विराट आता अशा वयात पोहोचले आहेत जिथे त्यांना तरुण खेळाडूंइतकीच नव्हे तर त्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही परदेश दौऱ्यावर जाता, तेव्हा तुम्हाला आधीच तयारी करावी लागते. वय वाढत असताना सरावासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. फिटनेस महत्त्वाचा असतोच, पण क्रिकेटमध्ये हात-डोळ्यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. हे दुर्लक्षित करता येणार नाही.”
अश्विनच्या या विधानाने क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चेची लाट उसळली आहे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, अश्विनने दिलेला सल्ला वास्तववादी आहे, मात्र त्याचा अप्रत्यक्ष संदेश दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना लक्ष्य करणारा होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही पूर्णपणे फॉर्मबाहेर दिसले.
रोहित शर्माने केवळ ८ धावा केल्या, आणि जोश हेझलवूडच्या शॉर्ट-पिच चेंडूवर बाद झाला. विराट कोहली तर ८ चेंडूत शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याच्या ऑफ-स्टंप कमकुवतपणाचा अचूक फायदा घेतला आणि पॉइंटवर झेल देण्यास भाग पाडले.
रोहित-विराट यांची कारकीर्द भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णयुगाप्रमाणे ठरली आहे, पण आता त्यांच्यासमोर नव्या आव्हानांची वेळ आली आहे. वय, फॉर्म आणि संघातील स्पर्धा लक्षात घेता, पुढील दोन वर्षे या दोघांसाठी निर्णायक ठरणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.