
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत मोठा बदल करण्यात आला असून, रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, अनुभवी फलंदाज विराट कोहलीचीही संघात निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्माच्या उत्कृष्ट कामगिरी आणि प्रभावी नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याला पुन्हा कर्णधारपद न देण्याच्या निर्णयामुळे अनेक चाहत्यांमध्ये आणि माजी खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘तेरा नाम लिया तुझे याद किया...’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी अप्रत्यक्षपणे या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा हा व्हिडिओ काही क्षणांतच व्हायरल झाला असून चाहत्यांनीही मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेक चाहत्यांनी बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “राजकारण जिंकलं आणि श्रेयस अय्यर हरला.” तर काहींनी शुभमन गिलच्या कर्णधारपदावर आनंद व्यक्त करत, भविष्यातील नेतृत्वाची नवी दिशा असल्याचं म्हटलं आहे.
रोहित शर्माचा विक्रमी परफॉर्मन्स
रोहित शर्मा हा एकदिवसीय स्वरूपातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी ५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून, त्यापैकी ४२ सामने भारताने जिंकले आणि फक्त १२ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २७ आयसीसी स्पर्धांमध्ये केवळ दोन सामन्यांत पराभव पत्करला आहे. विजयाची टक्केवारी तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक आहे. तुलनेत विराट कोहलीचा विजयाचा टक्का ६८.४२ आणि माजी कर्णधार एमएस धोनीचा ५५ टक्के आहे.
रोहित शर्माने आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत — चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्याला पुन्हा एकदिवसीय कर्णधारपद न देण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही.
सध्या मात्र सर्वांचे लक्ष आगामी मालिकेकडे लागले आहे, जिथे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली मात्र वरिष्ठ खेळाडू म्हणून संघात आपला अनुभव देताना दिसतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.