Amit Shah Goa: 'पर्रीकरांची आठवण, काँग्रेसला चिमटे, स्वदेशीचा नारा'; अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा..

Amit Shah Goa Visit: राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातील २० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
Amit Shah Goa Visit
Amit Shah Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात येत आहे. ज्या वेगाने भाजप सरकारने येथे लोककल्याणकारी योजना राबविल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, या कामांची गती पाहिल्यास २०४७ ची वाट पहावी लागणार नाही. २०३५ ते ३७ पूर्वीच गोवा विकसित होईल आणि ते देशातील पहिले विकसित राज्य बनेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातील २० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

सांताक्रूझ येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत,

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार राजेश फळदेसाई, मायकल लोबो, दिलायला लोबो, प्रवीण आर्लेकर, रुडॉल्फ फर्नांडिस, दिव्या राणे, उल्हास तुयेकर, आंतानियो वाझ, जीत आरोलकर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

शहा म्हणाले की, माझे घर योजना ही केवळ सरकारी योजना नाही, तर कुशल प्रशासन आणि संवेदनशील सरकारचा परिचय देणारी योजना आहे. ११ प्रकारच्या कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या गोव्यातील नागरिकांना स्वतःच्या घरांचा अधिकार देणे आणि तो उद्यापासून ‘आपले घर’ संबोधू शकतो, ही सक्षमीकरणाचे निशाण आहे.

गोवा स्वतंत्र झाल्यापासून घरे नियमित करण्याची मागणी होत राहिली. शिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे घरे तोडण्याची टांगती तलवार राहिली. परंतु डॉ. प्रमोद सावंत सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या घरांविषयी एकच कायदा करून सर्व अडचणी दूर करीत राज्याच्या अर्ध्याअधिक लोकसंख्येला फायदा मिळवून दिला.

‘माझे घर’ योजनेसाठी राज्य सरकारने केलेल्या तरतुदींचा दाखला देत शहा म्हणाले, सरकारच्या या योजनेमुळे १९७५ सालापूर्वीची आणि २०१४ पूर्वींच्या घरांना आता स्वामित्व मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांची ३०० चौरस मीटरची घरे कायदेशीर होणार आहेत.

१९७२ पूर्वीची ज्यांची घरे आहेत, त्यांना आता रूपांतरण आणि सनदेची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे घर दुरुस्ती असो वा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढायचे असेल तर त्या व्यक्तीस कायदेशीर प्रक्रिया करून ते काढता येणार आहे.

शिवाय घरातील कर्त्या व्यक्तीच्या पश्चात त्या घरातील सदस्याच्या नावावर घर नोंदविले जाणार आहे. मी गुजरातमध्ये बराच काळ आमदार राहिलो; पण सावंत यांनी दहा लाख लोकांना घरांचे मालक बनविण्याचे काम केले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून ही प्रेरणा मिळत आहे.

या कार्यक्रमास विधानसभा सभापती गणेश गावकर, मंत्री रवी नाईक, आमदार गोविंद गावडे, आलेक्स रेजिनाल्ड, जेनिफर मोन्सेरात अनुपस्थित होत्या.

‘स्वदेशी’चा पुरस्कार करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. त्यामुळे गोवा राज्यातील व्यापाऱ्यांनी आणि जनतेने स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा. तसेच परदेशी वस्तूंचा वापर टाळावा, असे सांगत स्वदेशी उत्पादनांना पाठिंबा देऊन स्वदेशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केले.

मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा!

आधुनिक गोव्याचे निर्माते म्हणून मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाहिले जाते. पर्रीकर यांच्या नावाचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणात सुरुवातीलाच केला. ते म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची मनःपूर्वक आठवण करतो, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. साधी राहणी, प्रामाणिकपणा, पारदर्शक कारभार ही पर्रीकरांची वैशिष्ट्ये होती, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसला चिमटे!

गोव्यात जेव्हापासून भाजप लागोपाठ जिंकत आला, त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘गोवा हे छोटे राज्य आहे’, असे म्हटले होते. याची आठवण करीत शहा म्हणाले, खर्गेसाहेब राज्य लहान असो किंवा मोठे, या राज्यात जो नागरिक राहतो तो भारताचाच नागरिक आहे. लहान राज्यातील नागरिकांचे महत्त्व हे देशातील मंत्री आणि पंतप्रधानांएवढेच आहे.

Amit Shah Goa Visit
Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

पुढील ५० वर्षांसाठी विकास प्रकल्प : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ‘माझे घर’ योजनेमुळे मोकासा, अल्वारा, कोमुनिदाद, सरकारी आणि महसूल जमिनीवर बांधलेल्या घरांची संबंधितांना मालकी मिळेल. पुढील सहा महिन्यांत सर्व लाभार्थ्यांना मालकी मिळेल. मी संबंधित विभागांना शक्य तितक्या लवकर त्यावर प्रक्रिया करण्याची विनंती करेन.

गोव्यातील तरुणांसाठी डबल इंजिन सरकारचे एक स्वप्न आहे. प्रशासन स्तंभ, युनिटी मॉल अशा प्रकल्पांची उभारणी, तसेच जुन्ता हाऊस, आल्तिनो येथील सरकारी निवासस्थाने, पोलिस निवासस्थाने यांचा पुनर्विकास केला जाईल. तसेच पुढील ५० वर्षांसाठी नियोजित विकास प्रकल्प उभारले जातील, असे सावंत यांनी नमूद केले.

Amit Shah Goa Visit
Amit Shah: अमित शहांच्या हस्ते 2451 कोटींच्या विकासकामांची होणार सुरुवात! मुखर्जी स्टेडियमवर 10 हजार लोक जमणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

क्षणचित्रे

व्यासपीठावरील घराच्या दर्शनी भागासारखी सजावट लक्ष वेधून घेत होती.

दुपारी दोन वाजल्यापासून बसेस व खासगी वाहनांचे कार्यक्रम स्थळाकडे आगमन.

स्टेडियमबाहेरील जागेत डिजिटल पडदे लावून कार्यक्रम पाहण्याची सोय.

लोकांसाठी दोन मार्ग, तर व्हीआयपींसाठी एका मार्गाचा अवलंब.

महामार्ग ते दोना पावलापर्यंत रस्ता दुभाजकांवर मंत्र्यांच्या छबीसह कार्यक्रमांचा फलक.

वाहने पार्किंगसाठी तीन ठिकाणी सुविधा, तरीही बसेससाठी जागा अपुरी.

सायंकाळी ६.२२ वाजता गृहमंत्री अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून शहा यांचे कुणबी शाल व गुलाबांचा पुष्पहार घालून स्वागत.

मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली चांदीच्या गणपतीची मूर्ती भेट.

संजीवनी अकादमीच्या मुलींनी गायले स्वागत गीत.

अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शांतादुर्गा, मंगेश आणि म्हाळसा देवीला केले वंदन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com