

IPL 2026 Update : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्स (RR) हा संघ यंदा आपले घरचे सामने जयपूरऐवजी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळण्याची दाट शक्यता आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम सुरक्षा मानकांवर (Safety Norms) खरे उतरू शकले नाही, तसेच राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबतच्या मतभेदांमुळे फ्रँचायझीने पुण्याचा पर्याय निवडल्याचे समजते. यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींना यंदा 'पिंक आर्मी'चा थरार जवळून अनुभवता येणार आहे.
पुण्याचे गहुंजे स्टेडियम आयपीएलसाठी नवे नाही. यापूर्वी पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे हे होम ग्राउंड होते. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुण्याची निवड केली होती आणि त्यावर्षी त्यांनी विजेतेपद पटकावले होते.
आता तोच कित्ता गिरवत राजस्थान रॉयल्स देखील पुण्यात नशीब आजमावणार आहे. दरम्यान, बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबी (RCB) संघानेही पुण्यात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र व्यंकटेश प्रसाद यांनी केएससीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आरसीबीचे सामने बेंगळुरूमध्येच होण्याची चिन्हे आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने आक्रमक बोली लावली. त्यांनी भारताचा स्टार फिरकीपटू रवी बिश्नोई याला ७.२ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले. बिश्नोईची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
याशिवाय संघाने मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू विग्नेश पुथूर आणि यश राज पुनिया यांसारख्या युवा खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपयांत खरेदी करून आपल्या बेंच स्ट्रेंथवर लक्ष केंद्रित केले आहे.
यावेळच्या लिलावापूर्वी एक मोठा 'ट्रेड' पाहायला मिळाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसेल. त्याच्या बदल्यात राजस्थानने रवींद्र जाडेजा आणि सॅम करन या दोन तगड्या अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात घेतले आहे.
संघाने यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंना कायम ठेवले आहे, तर विदेशी खेळाडूंमध्ये नांद्रे बर्गर आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. पुण्याच्या मैदानावर हा नवा कोरा राजस्थान संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.