MP Assembly Election: कर्नाटकातील दणदणीत विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळेच आता काँग्रेस पक्षात आगामी निवडणुकांबाबत उत्साह दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारीही पक्षाने सुरु केली आहे.
याच वर्षी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकाही होणार असून आता राहुल गांधी यांनी काँग्रेस मध्य प्रदेशात 150 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत पक्षाच्या राज्य युनिट आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला राहुल गांधी आणि पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, कर्नाटकात आम्हाला 136 जागा मिळाल्या.
आम्ही कर्नाटकात जे केले त्याचीच पुनरावृत्ती आम्ही मध्य प्रदेशात करणार आहोत. मध्य प्रदेशात आम्हाला 150 जागा मिळतील, असे आमचे अंतर्गत मूल्यांकन सांगते.
राहुल गांधी आपले म्हणणे मांडून निघून जाऊ लागले, असता पत्रकारांनी राहुल गांधींना मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत प्रश्न केला.
त्यावर राहुल परत आले आणि 'आम्हाला 150 जागा मिळतील' असे म्हणून निघून गेले. अशा प्रकारे राहुल गांधींनी चतुराईने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या प्रश्नाला बगल दिली.
दुसरीकडे, काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कमलनाथ यांचा दावा प्रबळ आहे. दिग्विजय सिंह यांच्या नावाचीही चर्चा होते, पण दिग्विजय सिंह यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून स्वत:ला मागे खेचून घेतले आहे, आपण मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशात गेल्या दोन दशकांपासून भाजपचे राज्य आहे, मध्यंतरी काँग्रेसचे सरकार आले पण ते फार काळ टिकू शकले नाही. सिंधियाच्या बंडखोरीमुळे काही महिन्यांतच काँग्रेसचे सरकार पडले.
यावेळी भाजपलाही (BJP) सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो, मात्र मध्य प्रदेशाच्या राजकारणात भाजपला कधीही कमकुवत मानता येणार नाही. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.