लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला PUBG चे इतके व्यसन लागले की, त्याने आपल्या आईलाच गोळ्या घालून ठार केले. (PUBG prevented Boy shot his mother in lakhnau)
त्याच्या आईने त्याला PUBG खेळण्यापासून थांबवले म्हणून मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्याने बहिणीला तोंड न उघडण्याची धमकी दिली होती. आपला गुन्हा झाकण्यासाठी त्याने पुढचे दोन दिवस आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आईचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, या काळात मुलगा काही घडले नसल्यासारखे वागत होता. मित्रांसोबत खेळायचा, मित्रांना घरी बोलावायचा, चित्रपट बघायचा, मस्त जेवण करायचा. मात्र काही दिवसातच एक दिवस सायंकाळी घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिस तेथे पोहोचले आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
मुलाने पोलिसांना सांगितली सुन्न करणारी कथा
लखनऊचे एडीसीपी ईस्ट कासिम अब्दी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, पीजीआय पोलीस स्टेशन परिसरात एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. तेव्हा 40 वर्षीय साधना सिंग खोलीत मृतावस्थेत आढळली. मृत साधना हिचा पती सैन्यात जेसीओ आहे, तो सध्या पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यात तैनात आहे. साधना तिच्या 16 वर्षांच्या मुलासह आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत पीजीआय परिसरात राहत होती.
पोलिसांनी या प्रकरणी प्रथम मृताच्या 16 वर्षीय मुलाची चौकशी केली, त्यानंतर त्याने सांगितले की, घरात इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्याच्या आईची हत्या केली होती. या मुलाच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृताच्या 10 वर्षांच्या मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सर्व प्रकार सांगितला.
एडीसीपी कासिम अब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन होते. त्याची आई साधना त्याला मोबाईलपासून दूर राहण्यास सांगायची. रविवारी दुपारी मोबाईलवर PUBG खेळल्याबद्दल आईने मुलाला खडसावले. यानंतर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साधना झोपी गेल्यावर मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने आईवर गोळी झाडली. यानंतर त्याने त्याच्या 10 वर्षीय बहिणीलाही धमकावले आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले.
मात्र, पोलिसांच्या तपासात हे प्रकरण आरशासारखे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलीस आरोपी मुलावर अल्पवयीन मुलांसाठी बनवलेल्या कायद्यानुसार कारवाई करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.