

नवी दिल्ली/इस्लामाबाद: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. सध्या एका पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने चक्क चालत भारतीय सीमा ओलांडल्याचा दावा केला आहे. मात्र, तिचा हा दावा इतका फोल ठरला की, भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांतील नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
स्वतःला शोध पत्रकार म्हणवून घेणारी पाकिस्तानी इन्फ्लुएंसर सना कादिर हिने पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यातील गंडा सिंग वाला बॉर्डरचा (Ganda Singh Border) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सना एका बांबू आणि दोऱ्यांनी बनवलेल्या तात्पुरत्या कुंपणापाशी उभी आहे. "मी कोणत्याही अडथळ्याविना हे कुंपण ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे," असा दावा तिने व्हिडिओमध्ये केला आहे. इतकेच नाही तर, एका बांधकामाच्या जागेकडे बोट दाखवत तिने पाकिस्तानचा विकास भारतापेक्षा किती पुढे आहे, अशा वल्गनाही केल्या.
सनाचा हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 'बॉर्डर गेट' स्पष्टपणे दिसत असून सना अजूनही पाकिस्तानच्याच हद्दीत असल्याचे युजर्सनी पुराव्यासह सिद्ध केले. आंतरराष्ट्रीय सीमा ही काही साध्या दोरीने किंवा बांबूने ठरवली जात नाही, याचे भानही तिला नसल्याचे लोकांनी निदर्शनास आणून दिले. भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ (BSF) आणि पाक रेंजर्सची २४ तास कडक पहारा असतो, तिथे कोणीही असे सहज चालत येऊ शकत नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सना ज्या बांधकामाचा उल्लेख करत होती, ती जागा प्रत्यक्ष सीमेपासून कित्येक मीटर दूर असून तो पाकिस्तानचाच भाग आहे. सोशल मीडियावर तिला ट्रोल करताना एका युजरने लिहिले, "स्वतःला शोध पत्रकार म्हणवता आणि तुम्हाला 'झिरो लाईन'ची साधी समज नाही?" तर दुसऱ्याने याला 'सस्ता प्रोपेगंडा' म्हणत केवळ फॉलोअर्स मिळवण्यासाठी केलेली ही नौटंकी असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमुळे तिची फजिती झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे हसे होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.