
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज, २० ऑक्टोबर रोजी रावळपिंडी येथे खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या पाकिस्तान संघात आज काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सामन्यात ३८ वर्षीय आसिफ आफ्रिदीला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
२५ डिसेंबर १९८६ रोजी पेशावर येथे जन्मलेल्या आसिफ आफ्रिदीने वयाच्या ३८ व्या वर्षी आपला पहिला कसोटी सामना खेळला आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज असून पाकिस्तानच्या घरेलू क्रिकेटमध्ये त्याचे योगदान उल्लेखनीय आहे.
आतापर्यंत त्याने ५७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए स्वरूपात त्याने ६० सामन्यांमध्ये ८३ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-२० क्रिकेटमध्ये ८२ डावांत ७८ फलंदाजांना बाद केले आहे. त्याच्या कसोटी पदार्पणात तो काय कमाल दाखवतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आसिफ आफ्रिदीने उशिरा पदार्पण केले असले तरी तो एकमेव खेळाडू नाही ज्याने वयाच्या उत्तरार्धात कसोटी पदार्पण केले आहे. क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा जेम्स साउथर्टन हा सर्वात वयस्कर कसोटी पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९ वर्षे ११९ दिवस वयात आपला पहिला सामना खेळला होता. भारताकडून सर्वात उशिरा कसोटी पदार्पण करणारा खेळाडू रुस्तमजी जमशेदजी असून त्याने १९३३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४१ वर्षे २७ दिवस वयात पदार्पण केले होते.
दरम्यान, रावळपिंडी कसोटीमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा लेख लिहिताना, २५ षटके पूर्ण झाली असून पाकिस्तानने एका विकेटच्या मोबदल्यात ८१ धावा केल्या आहेत. अब्दुल्ला शफीक ३१ आणि शान मसूद ३० धावांवर खेळत आहेत, तर इमाम-उल-हक १७ धावांवर बाद झाला आहे.
या सामन्यात पाकिस्तानला मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी मिळवायची आहे, तर दक्षिण आफ्रिका संघ पुनरागमनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आता सर्वांचे लक्ष ३८ वर्षीय आसिफ आफ्रिदीच्या ऐतिहासिक पदार्पणाकडे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.