

ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यात एका दगड खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटामुळे खाणीचा भाग कोसळला असून अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्राथमिक माहितीनुसार ही खाण अनधिकृतपणे चालवली जात होती. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा दावा केला जात असून प्रशासन सध्या मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढेंकनालच्या गोपालपूर भागात ही दुर्घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. खाणीत स्फोट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती.
बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असताना हा स्फोट झाला आणि कामावर असलेले मजूर तिथेच अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची नाकाबंदी केली असून सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
सध्या ढेंकनालचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (SP) स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती मजूर दबले गेले आहेत, याचा शोध घेण्यासाठी ओडिशी आपत्ती व्यवस्थापन दल (ODRAF), अग्निशमन दल आणि श्वान पथकाची (Dog Squad) मदत घेतली जात आहे. अद्ययावत उपकरणांच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून, सरकारी पातळीवर अद्याप मृतांच्या अधिकृत आकड्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
या दुर्घटनेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, "ढेंकनाल खाण दुर्घटनेची बातमी ऐकून दुःख झाले आहे. यात अनेक मजुरांनी आपला जीव गमावल्याचे समजत आहे. पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे." पटनायक यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, भविष्यात मजुरांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.