

मडगाव: गोव्यात नाईट क्लब धोरण नाही, त्यामुळेच बेकायदेशीरपणाला वाव मिळतो, असा दावा आता काही मंत्री आणि आमदार करु लागले आहेत. जर हे गोव्यात धोरण तयार केलेच नाही तर गेल्या पाच वर्षांत सुमारे २०० बेकायदेशीर नाईट क्लबस् राज्यात उभे कसे झाले आणि हे बेकायदा क्लब चालू असताना एकाही आमदार किंवा मंत्र्यांने त्यावर आवाज का उठविला नाही, असा सवाल भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य सावियो रॉड्रिगीस यांनी केला आहे.
नाईट क्लब ही गोव्याची संस्कृती नाही. गोव्यातील सर्व नाईट क्लब बंद झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे. हडफडे येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेत २५ लोकांचे बळी गेल्यानंतर रॉड्रीग्स यांनी हा प्रश्र्न प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयापर्यंत नेला होता.
ही दुर्घटना म्हणजे, गोव्यातील प्रशासनाने बेकायदेशीरपणाला वाव देऊन २५ जणांचे केलेल खू्न असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर रॉड्रिगीस हे आमच्या कुठल्याही समितीवर नाहीत असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला होता.
या दुर्घटनेसंदर्भात जी न्यायदंडाधिकारी स्तरावर चौकशी झाली तीही तकलादू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज्यात नाईट क्लब धोरण नाही म्हणून गळा काढणाऱ्या मंत्र्यांविरोधात आवाज उठविताना जर कुठल्याही धोरणाशिवाय हे क्लब चालत होते, तर त्यांना परवाने कसे मिळाले आणि त्यांचे नंतर नूतनीकरण कसे झाले असा सवालही त्यांनी केला आहे.
क्लब आणि पब ही गोव्याची संस्कृती नाही. त्यामुळे येत्या विधानसभा अधिवेशनात गोव्यात नाईट क्लब धोरण आणण्यासाठी कायदा करावा, अशी ही मागणी काही आमदारांकडून होऊ लागली आहे, ती अयोग्य असून विधानसभा अधिवेशनात असा कायदा आणण्याचा विचारही कुणी व्यक्त करु नये, अशी मागणी केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केली आहे.
डिक्सन वाझ हे स्वत: हॉटेलियर आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ संदेश जारी करताना वाझ यांनी, गोव्यात जे पर्यटक येतात ते गोव्याचे निसर्ग सौंदर्य आणि जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
गोव्यात नाईट क्लबच्या नावाने धागडधिंगा सुरु झाल्यास असे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील. विशेषत: दक्षिण गोव्यात अजूनही ही संस्कृती पोचलेली नाही. त्यामुळे स्थानिक लोक आणि स्थानिक हॉटेलियर्स यांना असे धोरण पाहिजे की नाही यावर त्यांची मते अजमावून पहावीत. गोव्यात आम्हाला चांगला दर्जेदार पर्यटक यायला हवा. त्
यांच्यासाठी मनोरंजनाच्या सुविधाही असणे आवश्यक आहे. मात्र क्लब कल्चरच्या नावाने रात्रभर धिंगाणा घालून स्थानिकांचे स्वास्थ बिघडविणारे धोरण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको, असे त्यांनी म्हटले आहे.गोव्यासाठी नाईट क्लब धोरण पाहिजे असे म्हणणाऱ्या आमदारांनी आपल्या मागणीवर पुन्हा एकदा विचार करावा आणि मुख्यमंत्र्यांनीही या मागणीला थारा देऊ नये, असे वाझ यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.