

NCERT Syllabus Change 2026: देशाच्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिल्यांदाच इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या पाठ्यपुस्तकात 1975 मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या 'आणीबाणीचा' इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
आतापर्यंत आणीबाणी (Emergency) आणि लोकशाही राजकारणाचा हा कालखंड प्रामुख्याने इयत्ता 12 वीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकात सविस्तरपणे शिकवला जात होता. मात्र, आता एनसीईआरटीने हा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील ऐतिहासिक घटनाक्रम शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच म्हणजेच 9 वीच्या पातळीवर मांडण्याचा निर्णय घेतला.
शिक्षण मंत्रालय आणि एनसीईआरटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या बदलाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीचा प्रवास आणि त्यासमोरील आव्हानांची माहिती कमी वयातच करुन देणे हा आहे. लोकशाहीत नागरिकांचे अधिकार आणि घटनात्मक संस्थांचे महत्त्व काय असते, तसेच आणीबाणीच्या काळात देशाची राजकीय आणि सामाजिक स्थिती कशा प्रकारे प्रभावित झाली होती, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यावर नव्या अभ्यासक्रमात भर देण्यात आला.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पुस्तके अधिक व्यावहारिक, तार्किक आणि देशाच्या वास्तविक इतिहासाच्या जवळ आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.
या सुधारित अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रकरणांमध्ये अनेक महत्त्वाच्या पैलूंचा समावेश करण्यात आला. यामध्ये 25 जून 1975 ची पार्श्वभूमी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करण्यामागची मुख्य कारणे आणि त्याची संपूर्ण क्रोनोलॉजी सोप्या भाषेत समजावून सांगितली जाईल.
याशिवाय, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे झालेले निलंबन, वृत्तपत्रांवर लादलेली सेन्सॉरशिप आणि विरोधी पक्षनेत्यांची झालेली अटक याबद्दलचे निष्पक्ष तथ्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले जातील. तसेच, 1977 मध्ये आणीबाणीची झालेली समाप्ती आणि देशात पुन्हा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी झालेल्या संघर्षाची कहाणीही या अभ्यासक्रमाचा भाग असेल.
एनसीईआरटीच्या या निर्णयामुळे देशाच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात आता चर्चांना उधाण आले. एका बाजूच्या मते, शालेय मुलांना देशाच्या राजकीय इतिहासातील सर्व कडू-गोड पैलूंची निष्पक्ष माहिती मिळायला हवी, जेणेकरुन ते एक जागरुक नागरिक बनू शकतील. तर काही तज्ज्ञांच्या मते, 9 वीच्या विद्यार्थ्यांची मानसिक पातळी लक्षात घेता हा संवेदनशील विषय कोणत्याही राजकीय पूर्वग्रहाशिवाय अत्यंत संतुलित पद्धतीने सादर केला गेला पाहिजे. एनसीईआरटीची ही नवीन आणि सुधारित पाठ्यपुस्तके आगामी शैक्षणिक सत्रापासून देशभरातील सीबीएसई आणि एनसीईआरटीचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व राज्य बोर्डांच्या शाळांमध्ये लागू केली जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.