National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईडीकडे चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी आईच्या आजारपणाचा हवाला दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला विनंती करुन राहुल गांधींनी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राज्यात आंदोलन करत आहेत.
दरम्यान, सोनिया गांधींना (Sonia Gandhi) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सर गंगाराम रुग्णालयात त्या दाखल आहेत. बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) रुग्णालयात गेले. जिथे त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. याच प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.
कार्यकर्त्यांनी आंदोलन केले
बुधवारी निदर्शनादरम्यान काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी ईडी चौकशीविरोधात आंदोलन केले. कॉंग्रेसमधील बड्या नेत्यांनीही धरणे आंदोलन करत भाजपवर निशाणा साधला. ईडी कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राहुल यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेसने म्हटले की, 'राहुल गांधी पीएम मोदींचा प्रतिकार करत आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.' दिल्ली पोलीस काँग्रेस मुख्यालयात घुसल्याचा आरोपही काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर केला होता. काँग्रेस यासाठी एफआयआरची मागणी करत आहे, तर पोलीस त्यास विरोध करत आहेत. ईडीने मंगळवारी 11 तास आणि सोमवारी 10 तासांपेक्षा जास्त वेळ राहुल गांधींची चौकशी केली.
काय आहे नॅशनल हेराल्ड केस
भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2013 मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता. स्वामींनी दावा केला होता की, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ 50 लाख रुपये दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.