
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने मंगळवारी (२ सप्टेंबर) अधिकृतरीत्या निवृत्तीची माहिती दिली असून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेदेखील या निर्णयाची पुष्टी केली आहे.
स्टार्कने सांगितले की, तो आता पूर्णपणे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. त्याचे प्रमुख ध्येय २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक आणि भारतातील कसोटी मालिका तसेच अॅशेस मालिका खेळणे आहे. त्यामुळेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटला रामराम केला.
३५ वर्षीय स्टार्कने मागील टी-२० विश्वचषकात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विशेष म्हणजे २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वीच त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार्कने एकूण ७९ विकेट घेतल्या असून या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अॅडम झांपा (१३० विकेट्स) पहिल्या स्थानी आहे.
स्टार्कसाठी या फॉरमॅटमधील सर्वात मोठा क्षण २०२१ चा टी-२० विश्वचषक ठरला. त्या वेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते. त्याबाबत स्टार्कने भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटले,
"कसोटी क्रिकेट हे नेहमीच माझे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. मी ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या प्रत्येक टी-२० सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे, विशेषतः २०२१ च्या वर्ल्ड कपमध्ये.
आम्ही विजेते ठरलो याचा आनंद तर आहेच, पण त्यावेळी आमच्या संघातील वातावरणही अविस्मरणीय होते. २०२७ मधील मोठ्या मालिकांसाठी ताजेतवाने राहणे आणि माझ्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा निर्णय योग्य आहे."
स्टार्क आता कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळत राहणार असून देशांतर्गत टी-२० लीग्समध्ये, विशेषतः आयपीएलमध्ये (IPL) तो मैदान गाजवताना दिसणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.