
मेरठ-कर्नाल सेक्शन (NH-709A) वरील भुनी टोल प्लाझावर रविवारी मोठा गोंधळ झाला. एका लष्करी जवान आणि टोल कर्मचाऱ्यांमधील वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित टोल एजन्सीवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच भविष्यातील निविदांमधून एजन्सीला कायमस्वरूपी वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, लष्करी जवान कपिल कवड हे काश्मीरमध्ये तैनात असून ते ड्युटीवर रुजू होण्यासाठी दिल्लीला जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा चुलत भाऊही होता. दिल्ली विमानतळावर पोहोचण्याच्या घाईत त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की लांब रांगेत थांबल्यास विमान सुटू शकते.
मात्र, या वादाचा पारा चढत गेला आणि अखेरीस टोल कर्मचाऱ्यांनी जवानाला पकडून खांबाला बांधले व बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले. संतप्त जमावाने टोल प्लाझावर धडक देत तोडफोड केली व टोल ऑपरेशन बंद पाडले. यामुळे अनेक तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.
एनएचएआयने स्पष्ट केले आहे की प्रवाशांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे आणि अशा घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. कराराच्या अटींचे उल्लंघन आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगामुळे एजन्सीवर दंड लावण्यात आला आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही प्राधिकरणाने जाहीर केले.
या प्रकरणावर स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टोल कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.