

Madhya Pradesh Bhind Road Accident: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली. हा अपघात एवढा भीषण होता की, 5 मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य 3 जणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. या अपघातात तब्बल 25 मजूर गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात भिंड-ग्वाल्हेर महामार्ग NH-719 वर छीमका गावाजवळ रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास घडला. भात लावणीचे काम पूर्ण करुन आपापल्या घरी परतणाऱ्या मजुरांनी भरलेल्या पिकअपला समोरुन येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांमधील धडक एवढी भीषण होती की, पिकअपचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनाही माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) ग्रामस्थांच्या मदतीने पिकअपच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून गोहद रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.
गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामनरेश यादव यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, महामार्गावर रात्रीच्या वेळी हा अपघात झाला असून मृत मजुरांच्या कुटुंबांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात या अपघाताचे मुख्य कारण महामार्गावर अचानक आलेला गाईंचा कळप असल्याचे समोर आले. रस्त्यावर बसलेल्या गाईंना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा जीवघेणा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.