

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांना महागाईचा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 सप्टेंबर 2026 पासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 9.50 रुपयांची वाढ केली आहे. मात्र घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलेंडरची किंमत वाढल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
नव्या दरांनुसार राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 2,747.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,738 रुपये होती.
मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,691.50 रुपयांवरून वाढून 2,701 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये हा सिलेंडर आता 2,916.50 रुपयांना उपलब्ध होणार असून पूर्वी त्याची किंमत 2,906 रुपये होती. दरवाढीमुळे विशेषतः खाद्यपदार्थ व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांच्या मासिक खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
19 किलोच्या सिलेंडरबरोबरच छोट्या व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या 5 किलो नॉन-डोमेस्टिक भरलेल्या सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. हा सिलेंडर आता 764 रुपयांना मिळणार असून यापूर्वी त्याची किंमत 762 रुपये होती.
मात्र सामान्य 5 किलोचा सिलेंडर आणि XTRALITE सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सामान्य 5 किलो सिलेंडरची किंमत 349.50 रुपये असून XTRALITE सिलेंडरचा दर 339 रुपये कायम आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईत एलपीजीचे दर तुलनेने कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर 941.50 रुपयांना उपलब्ध आहे, तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2,701 रुपयांना मिळत आहे.
दुसरीकडे, लेहमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत सर्वाधिक आहे. येथे घरगुती गॅस सिलेंडरसाठी 1,179 रुपये मोजावे लागत आहेत, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 3,385.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षांतील दरबदलांचा आढावा घेतल्यास 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत सातत्याने वाढच झाली असे चित्र नाही. 2014 ते 2026 या कालावधीत काही वर्षांत दर कमी झाले, तर काही वर्षांत वाढले. एका वर्षात किमतीत कोणताही बदल झाला नव्हता.
या कालावधीत 2017 मध्ये 115 रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. तर 2023 मध्ये ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा मिळाला होता, जेव्हा व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 157.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.
2026 मध्ये मात्र सप्टेंबरची सुरुवात 9.50 रुपयांच्या दरवाढीने झाली आहे. घरगुती सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी व्यावसायिक गॅस महागल्याने हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यवसायाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
2014: 32.50 रुपयांची कपात
2015: 41 रुपये स्वस्त
2016: कोणताही बदल नाही
2017: 115 रुपये महाग
2018: 47 रुपयांची वाढ
2019: 50.50 रुपये महाग
2020: 2 रुपयांची कपात
2021: 70 रुपयांची वाढ
2022: 91.50 रुपये स्वस्त
2023: 157.50 रुपयांची मोठी कपात
2024: 39 रुपये महाग
2025: 51.50 रुपये स्वस्त
2026: 9.50 रुपयांची वाढ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.