

निसर्गरम्य हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात पर्यटकांच्या एका गटावर भीषण काळाने झडप घातली आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास जालोरी खिंडीतून परतत असताना पर्यटकांनी भरलेला एक बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन महिलांसह एकूण चार पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व पर्यटक बंजार शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिभी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला होते. शनिवारी दिवसभर जालोरी खिंडीचा आनंद लुटल्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वजण भुंतरच्या दिशेने परतत होते. मात्र, परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल आणि निसरडेपणा निर्माण झाला होता. सोझाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि २२ प्रवाशांना घेऊन जाणारी ही गाडी थेट खोल दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ आणि दुर्गम भाग असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत होते.
तरीही १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिकांच्या मदतीने १८ प्रवाशांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या वाहनात दोन लहान मुलांसह एकूण २२ प्रवासी होते. जखमींना तातडीने बंजार येथील नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुल्लूचे उपायुक्त अनुराग चंदर शर्मा यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, "अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. एकूण १६ प्रवाशांना यशस्वीरीत्या वाचवून उपचारांसाठी हलवण्यात आले आहे." या पर्यटकांनी दिल्लीतून बुकिंग केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की रस्ता निसरडा असल्याने झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बंजार परिसरात आणि पर्यटकांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.