

Student Murder Case: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादातून या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अभिराम एम.डी. असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बारावीमध्ये शिकत होता. रविवारी घरातून बाहेर पडल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी एका निर्जन ठिकाणी गोणीत बंद केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी एका मुलीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिराम रविवारी दुपारी कुटुंबीयांना मित्राला भेटण्यासाठी पंगापारा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. घरातून निघण्यापूर्वी त्याला एक फोन कॉलही आला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी श्रीकार्यंम पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. तपासाचा भाग म्हणून अभिरामच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे तो शेवटचा कुठे गेला होता, याची माहिती गोळा करण्यात आली. या तपासादरम्यान सोमवारी संध्याकाळी पोलिस पंगापारा येथील एका निर्जन ठिकाणी पोहोचले. तेथे गोणीत भरलेला अभिरामचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागे प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला वाद असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अभिराम सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीच्या संपर्कात होता. मात्र, ताब्यात घेतलेल्या १७ वर्षीय मुलाचेही त्याच मुलीशी जवळचे संबंध असल्याचा संशय आहे. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अभिरामला पंगापारा येथे बोलावण्यासाठी संबंधित मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर त्याची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावा लपवण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून निर्जन ठिकाणी टाकण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका १७ वर्षीय मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. तसेच उमर नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हेगारी स्वरूपाची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याने मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि सर्व संशयितांची भूमिका तपासली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.