

Kashmiri Pandits Terror Threat Letters: काश्मीर खोऱ्यात दशकांनंतर पुन्हा एकदा कश्मीरी पंडितांना लक्ष्य करुन थेट धमक्या देण्याचा प्रकार समोर आला. दहशतवाद्यांनी अत्यंत बेधडकपणे कश्मीरी पंडितांच्या नावावर आणि थेट त्यांच्या घर आणि गल्ली क्रमांकासह चितावणीखोर पत्र पाठवले. या पत्रावर अधिकृत स्टॅम्प आणि पूर्ण पत्ते नमूद करण्यात आले असून, कश्मीरी पंडितांना भयंकर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला. या घटनेमुळे खोऱ्यात पुन्हा एकदा भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र 'युनायटेड लिबरेशन कॉन्सिल' या दहशतवादी संघटनेच्या नावाने पाठवण्यात आले, जी 'लष्कर-ए-तैयबा' या बंदी घातलेल्या संघटनेची उपशाखा मानली जाते. पत्रावर अहमद बिलाल नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आहे. या पत्रात कश्मीरी पंडितांना 'गद्दार' संबोधण्यात आले असून, ते दिल्लीतील सरकारच्या सांगण्यावरुन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. काश्मीर सोडून बाहेर गेलेले कश्मीरी पंडित आरएसएसचे (RSS) एजंट बनले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे, असा खळबळजनक दावा दहशतवाद्यांनी या पत्रात केला.
या घटनेची गंभीर दखल घेत काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने तपास सुरु केला. हे पत्र कुठून आणि कोणी पोस्ट केले, याचा शोध घेतला जात असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 1990 च्या दशकात झालेल्या तीव्र हिंसाचार आणि दहशतवादामुळे लाखो कश्मीरी पंडितांना आपले घरदार सोडून जम्मू, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये पलायन करावे लागले. आता पुन्हा अशा प्रकारे थेट घरावर नावासहित धमक्या आल्यामुळे कश्मीरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.