ISRO: अहमदाबादहून सूरजपूरला जाण्यासाठी निघालेले इस्रोचे तरुण शास्त्रज्ञ अखेर पुरीत सापडले. ओडिशातील पुरी रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रक्षाबंधन सण साजरा करुन आपल्या गावी परतत असताना ते 7 ऑगस्ट रोजी ओडिशातील पुरी येथून बेपत्ता झाले होते. पोलिसांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. यादरम्यानच तरुण शास्त्रज्ञाने एटीएममधून पैसे काढले असता त्याने केलेल्या ट्रांजेक्शनचा मेसेज मोबाईलवर येताच नातेवाइकांनी ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर स्थानिक पोलिसांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने वैज्ञानिकांना सात दिवसांनंतर पुरी रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतले. तरुण शास्त्रज्ञाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, दिपक पैकरा सूरजपूर जिल्ह्यातील लाटोरी चौकी अंतर्गत कास्केला गावचे रहिवासी आहेत. 2018-19 पासून ISRO अहमदाबादमध्ये (Ahmedabad) शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दिपक हे 5 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी अहमदाबादहून त्यांच्या गावी कास्केला येथे जाण्यासाठी निघाले होते. 6 ऑगस्ट रोजी दिपक नागपुरात (Nagpur) पोहोचल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद पडू लागला होता.
दुसरीकडे, ओडिशातील (Odisha) पुरी येथे त्यांचे शेवटचे लोकेशन दाखवत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन, एसपी रामकृष्ण साहू यांच्या सूचनेवरुन लाटोरी पोलिसांचे एक पथक कुटुंबीयांसह पुरी, ओडिशात पोहोचले. पुरीत पोहोचलेल्या टीमला आढळून आले की, बेपत्ता शास्त्रज्ञ हॉटेल ब्लू मूनमध्ये थांबले होते. 8 ऑगस्टपासून मोबाईल बंद असल्याने शास्त्रज्ञांशी संपर्क होऊ शकला नव्हता.
खात्यातून पैसे काढताच माहिती मिळाली
शनिवारी दुपारी अडीच वाजता दिपक पैकरा यांनी बॅंक खात्यातून तीन हजार रुपये काढले. त्यानंतर घरच्यांना मोबाईलवर मेसेजद्वारे पैसे काढल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी तात्काळ लाटोरी चौकीचे प्रभारी धनंजय पाठक यांना माहिती दिली. त्यानंतर चौकीच्या प्रभारींनी तात्काळ ओडिशाच्या सी-बीच स्टेशन, पुरीच्या प्रभारींना याची माहिती दिली. माहिती मिळताच पुरी सी-बीच स्टेशन प्रभारी तात्काळ टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि बेपत्ता शास्त्रज्ञ दिपक पैकरा यांना पुरी रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले.
शास्त्रज्ञ तणावाखाली होते
सी-बीच पोलिसांनी या शास्त्रज्ञांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची माहिती लाटोरी चौकीच्या प्रभारींना दिली. त्यानंतर लाटोरी चौकीचे दोन सदस्यीय पथक कुटुंबासह पुरीला पोहोचले. तरुण शास्त्रज्ञ दिपक पैकरा देखील एखाद्या गोष्टीमुळे तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.