
लीड्स कसोटीत भारतीय संघ आघाडीवर दिसत आहे. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. यशस्वी जयस्वाल १०१ धावा काढून बाद झाला, तर गिल १२७ धावा करून अजूनही क्रीजवर नाबाद आहे.
गिल आणि जयस्वाल यांनी पहिल्या दिवशी शतके झळकावून इतिहास रचला. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या भूमीवर पहिल्या दिवशी २ भारतीय खेळाडूंनी शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही २ भारतीय खेळाडूंना शतक झळकावता आले नव्हते.
शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावणारी पहिली भारतीय जोडी ठरली आणि असा पराक्रम ९३ वर्षांनंतर पाहायला मिळाला आहे.
याशिवाय, भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे जेव्हा दोन खेळाडूंनी परदेशी भूमीवर पहिल्या दिवशी शतके झळकावली आहेत.
हा पराक्रम पहिल्यांदा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या जोडीने केला होता. २००१ मध्ये, महान फलंदाजांच्या या जोडीने दक्षिण आफ्रिकेत पहिल्या दिवशी शतकं झळकावली होती. त्यानंतर २०१७ मध्ये, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी श्रीलंकेत झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतकं झळकावली होती.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, टीम इंडियाने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 359 धावा केल्या. यादरम्यान, यशस्वी जयस्वाल 101 आणि केएल राहुल 42 धावा करून बाद झाला, तर पदार्पण करणारा साई सुदर्शन पहिल्या दिवशी खाते न उघडता बाद झाला.
सध्या शुभमन गिल 127 धावांवर नाबाद आहे आणि उपकर्णधार ऋषभ पंत 65 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना, कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्या दिवशी 2 विकेट घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.