
IND vs PAK, Asia Cup 2025: क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीमध्ये रविवारी, 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून तो त्यांच्या अंतिम फेरीतील स्थानासाठी निर्णायक ठरु शकतो.
याआधी, ग्रुप-ए च्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवून विजय मिळवला होता. त्यावेळी भारताने (India) अष्टपैलू कामगिरी करत पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवले. आता पुन्हा एकदा भारतीय संघाकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयासाठी सज्ज झाला आहे.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल मानली जाते. संपूर्ण यूएईमध्ये फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते, परंतु दुबईची खेळपट्टी अबू धाबीच्या तुलनेत अधिक फिरकी गोलंदाजीला मदत करते. त्यामुळे, जर अनुभवी फिरकीपटू अक्षर पटेल पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर भारतीय संघ तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरु शकतो.
दुबईमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फायदा मिळतो, कारण येथील खेळपट्टीवर नंतर फलंदाजी करणे सोपे जाते. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
एकूण सामने: 116
प्रथम फलंदाजी करुन विजय: 53
प्रथम गोलंदाजी करुन विजय: 62
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 139
सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग: 184/8 (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश)
आकडेवारीनुसार, दुबईुच्या मैदानात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त यश मिळाले आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरु शकते.
भारतीय संघाने (Team India) ग्रुप स्टेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. फलंदाजीमध्ये सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मध्यक्रमात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यावर धावांची जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील, तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल (जर तंदुरुस्त असेल तर) यांच्यावर असेल. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक बळ देतात.
पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यांनी तीनपैकी एक सामना गमावला आहे. मागील सामन्यातील पराभवातून बोध घेऊन पाकिस्तानचा संघ कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला विजयाची नितांत गरज आहे. फलंदाजीमध्ये फखर जमान आणि शाहीन आफ्रिदीसारख्या खेळाडूंकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. विशेषतः, वेगवान गोलंदाज हारीस राऊफकडून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्याची अपेक्षा आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असते. दोन्ही देशांतील चाहते हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दुबईतील स्टेडियममध्ये दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असतील. हा सामना केवळ खेळाडूंच्या कौशल्याचा नाही, तर त्यांच्या मानसिक कणखरतेचा देखील कस पाहणार आहे. आजच्या या महामुकाबल्यात कोणता संघ सरस ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारतीय संघ आपले वर्चस्व कायम राखतो, की पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचा बदला घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.