

Sholay Returns In 4K: भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय चित्रपट असलेला 'शोले' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने, या निमित्ताने 'शोले'चा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 4K व्हर्जन चित्रपट 'शोले–द फायनल कट' (Sholay – The Final Cut) या नावाने 12 डिसेंबर 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तब्बल 1500 थिएटर्समध्ये दाखवला जाईल.
'शोले' पुन्हा रिलीज होणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण यानिमित्ताने प्रेक्षकांना या चित्रपटाचा 'अनकट व्हर्जन' (जो कधीच पाहिला नव्हता) पहिल्यांदाच पाहण्याची संधी मिळणार आहे.
1975 मध्ये जेव्हा 'शोले' रिलीज झाला, तेव्हा देशात आणीबाणी (Emergency) सुरु होती. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या नियमांनुसार चित्रपटातील काही दृश्ये बदलणे बंधनकारक होते. याचा परिणाम चित्रपटाच्या शेवटावर झाला होता. चित्रपटाचे (Movie) निर्माते सिप्पी फिल्म्स यांनी सोशल मीडियावर या खास रिलीजची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, "‘शोले: द फायनल कट’ 12 डिसेंबर 2025 पासून सिनेमा गृहात. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने 4K आणि डॉल्बी 5.1 मध्ये केलेले मूळ अनकट व्हर्जन पहिल्यांदा अनुभवण्याची संधी मिळेल."
या पुर्नप्रदर्शनातील सर्वात खास गोष्ट म्हणजे, चित्रपटाचा जो शेवट दाखवायचा होता, तो आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची मूळ कल्पना अशी होती की, ठाकूर (संजीव कुमार) हे त्यांच्या बुटक्यांच्या मदतीने गब्बर सिंहला (अमजद खान) मारतील आणि आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा सूड घेतील. त्यावेळी, मात्र सेन्सॉर बोर्डाला हे दृश्य खूप हिंसक वाटले होते. त्यामुळे, त्यांनी तो शेवट बदलण्यास सांगितला होता. त्यानंतर 1975 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात गब्बर सिंहला पोलीस पकडतात, असे दाखवण्यात आले होते.
आता दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची मूळ कल्पना पुन्हा चित्रपटात दाखवली जाणार आहे. त्यामुळे, 50 वर्षांपासून केवळ चर्चांमध्ये असलेला तो मूळ शेवट आणि त्याचा भावनात्मक परिणाम प्रेक्षकांना अखेर अनुभवता येणार आहे.
'शोले' चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशनचा हा रि-रिलीज मध्यवर्ती भाग आहे. यापूर्वी, याच वर्षी 'शोले' चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता, जिथे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची खूप वाहवा झाली होती.
चित्रपटातील कलाकार - अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया बच्चन, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खान - यांचा अभिनय आजही तितकाच गाजतो आहे. 1975 मध्ये रिलीज झाल्यापासून 'शोले'ने भारतीय संस्कृतीवर खूप मोठा प्रभाव टाकला. बॉक्स ऑफिसवर नंतर अनेक चित्रपटांनी कमाईचे विक्रम मोडले असले तरी, 'शोले' आजही सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.