"मी जगदीशचंद्र आर्य तुम्हाला माझ्यावर बेतलेले दु:ख सांगतोय. माझ्या मुलाची बधडा येथे 30 कोटींची मालमत्ता आहे, पण मला देण्यासाठी त्याच्याकडे दोन वेळची भाकर नाही. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने काही दिवस आम्हाला साथ दिली, मात्र नंतर ती चुकीचे कामे करू लागली. मी विरोध केला असता आम्हाला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले."
आयएएस अधिकाऱ्याच्या आजी-आजोबांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले हे शब्द आहेत. असे लिहिल्यानंतर दोघांनी एकत्र विष प्राशन केले होते. पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले.
पोलिस जेव्हा या जोडप्याच्या घरी पोहोचले तेव्हा दाम्पत्याने एक चिठ्ठी दिली होती. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे पाहून पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. जिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हरियाणातील चरखी-दादरी येथील बधडा येथील ही घटना आहे. मूळचे गोपी परिसरात राहणारे जगदीश चंद्र आर्य (78) आणि भागली देवी (77) यांनी सल्फासच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केली.
मृत वृद्ध जोडपे हे चरखी दादरी येथील आयएएस विवेक आर्य यांचे आजी-आजोबा होते. विवेकच्या वडिलांचे नाव वीरेंद्र आहे. 2021 मध्ये विवेकची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. त्याला हरियाणा केडर मिळाले आणि सध्या तो अंडर ट्रेनी आहे.
29 मार्चच्या रात्री जगदीश चंद्र आणि त्यांच्या पत्नीने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाला जोडप्याने सुसाईड नोट सुपूर्द केली. प्रकृती ढासळत असल्याचे पाहून पोलिसांनी दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. येथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
"घरातून हाकलून दिल्यानंतर मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो. परत आल्यावर त्यांनी घराला कुलूप लावले. या काळात माझी पत्नी अर्धांगवायूची शिकार झाली आणि आम्ही आमच्या दुसऱ्या मुलासोबत राहू लागलो. काही दिवसांनी दुसऱ्या मुलानेही माझ्यासोबत येण्यास नकार दिला आणि मला शिळे जेवण देऊ लागले. हे गोड विष किती दिवस खाणार म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली. माझ्या मृत्यूचे कारण माझ्या दोन सून, एक मुलगा आणि एक पुतण्या आहेत. या चौघांनी माझ्यावर जे अत्याचार केले ते कोणत्याही मुलाने आपल्या आई-वडिलांवर करू नये. असे जगदीश चंद्र आर्य यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
आई-वडिलांवर इतका अत्याचार करू नका, असे माझे ऐकणाऱ्यांना विनंती आहे. सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या बँकेत दोन एफडी असून बधडा येथे दुकान आहे, ते आर्य समाज बधडा यांना द्यावे. असे जगदीशचंद्र आर्य यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
याप्रकरणी डीएसपी वीरेंद्र शेओरान यांनी सांगितले की, जगदीश चंद्र यांनी पोलिसांना एक पत्र दिले होते. ही सुसाईड नोट मानली जाऊ शकते. कुटुंबीयांचा छळ होत असल्याचा आरोप करत मृताने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याचवेळी, मृताचा नातू आयएएस अधिकारी असून सध्या प्रशिक्षणार्थी आहे. याप्रकरणी पोलिसांनी सून, मुलगा वीरेंद्र आणि पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, विष प्राशन केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. वय आणि दोघेही आजारपणामुळे त्रस्त असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. असे मृताचा मुलगा वीरेंद्र याने सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.