
Indian man killed in US incident: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका २६ वर्षीय हरियाणामधील तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला लघवी करण्यापासून रोखल्यामुळे ही घटना घडल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
जिंद जिल्ह्यातील बराह कला गावातील कपिल हा तरुण गोळी लागल्यानंतर रस्त्यावर कोसळला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यानच त्याला मृत घोषित करण्यात आले.
'त्याने फक्त एका व्यक्तीला उघड्यावर लघवी करू नकोस असे सांगितले, आणि त्यासाठीच त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले,' अशी दुर्दैवी प्रतिक्रिया त्याच्या एका नातेवाईकाने स्थानिक पत्रकारांना दिली.
२०२२ मध्ये कपिलने 'डंकी' (बेकायदेशीर) मार्गाने सुमारे ४५ लाख रुपये खर्चून अमेरिका गाठली होती. तो आपल्या शेतकरी कुटुंबाचा एकुलता एक वारस होता आणि परदेशातून पैसे पाठवून कुटुंबाला मदत करत होता. ही घटना घडल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाला परदेशात पाठवण्यासाठी त्यांनी आपली सर्व बचत खर्च केली असल्यामुळे आता त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
या गोळीबारानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कपिलला जवळच्या रुग्णालयात पोहोचवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी अद्याप संशयिताचे नाव किंवा त्याला अटक केली आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.