
Harbhajan Singh Slapped Sreesanth, Video Viral: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) आता जवळपास 17 वर्षांची झाली आहे. 2008 मध्ये या लीगची सुरुवात झाल्यापासून दरवर्षी जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात आणि नवनवीन विक्रम रचतात. पण याच पहिल्या हंगामात एक मोठी घटना घडली होती, ज्याची क्रिकेट जगतात अनेक वर्षे चर्चा सुरु होती. ही घटना म्हणजे हरभजन सिंह आणि एस. श्रीसंत यांच्यातील 'स्लॅपगेट' प्रकरण. या घटनेचा व्हिडिओ कधीही समोर आला नव्हता, पण आता तब्बल 17 वर्षांनंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, 2008 मधील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला होता. याच सामन्याच्या शेवटी मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेल्या हरभजन सिंहने (Harbhajan Singh) पंजाबकडून खेळणाऱ्या श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. ही घटना तेव्हा कॅमेऱ्यात कैद झाली नव्हती, पण घटनेनंतर श्रीसंत मैदानातच रडताना दिसला होता, ज्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली होती. या प्रकरणामुळे हरभजनला आयपीएलमधून काही सामन्यांसाठी निलंबितही करण्यात आले होते. मीडियामध्ये या घटनेला 'स्लॅपगेट' असे नाव देण्यात आले होते.
ही घटना घडल्यानंतर तब्बल 17 वर्षांपर्यंत या घटनेचे फुटेज कोणाकडेही नव्हते. आता मात्र, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी तो व्हिडिओ जारी केला आहे. मोदी सध्या भारताबाहेर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क सोबत एका पॉडकास्टमध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. 'बियॉन्ड23 क्रिकेट पॉडकास्ट' नावाच्या या शोमध्ये ललित मोदींनी हा व्हिडिओ दाखवला, ज्यामुळे तो आता व्हायरल झाला आहे.
ललित मोदींनी या पॉडकास्टमध्ये सांगितले की, 'सामना संपल्यानंतर सगळे कॅमेरे बंद झाले होते. तरीही मैदानावरील सुरक्षा कॅमेरा चालू होता आणि त्याचमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली.' मोदी यांनी या घटनेच्या व्हिडिओ फुटेजवर आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'या व्हिडिओला समोर यायला जवळपास 17 वर्षे लागली.'
दरम्यान, या व्हिडिओमध्ये हरभजन सिंह आणि श्रीसंत एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. हरभजनने श्रीसंतच्या कानशिलात मारल्यानंतर श्रीसंत रडतानाही दिसतो. या घटनेनंतर दोघेही खेळाडू शांत झाले. हरभजनने नंतर या संपूर्ण प्रकरणाबद्दल खेदही व्यक्त केला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ही माझ्या आयुष्यातील एक अशी घटना आहे, जी मला माझ्या आयुष्यातून पुसून टाकायची आहे.’
आजही या घटनेमुळे हरभजन आणि श्रीसंत यांच्यात आजही तणाव असल्याचे सांगितले जाते, पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट जगतात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडिओने (Video) क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.