

Gurugram Live-In Partner Torture Case: गुरुग्राममधून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक भीषण घटना समोर आली. मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली एका 19 वर्षीय तरुणीवर झालेला अमानवीय अत्याचार पाहून संपूर्ण देश हादरला. या धक्कादायक कहाणीची सुरुवात सप्टेंबर 2025 मध्ये झाली, जेव्हा त्रिपुरा येथील मूळची रहिवासी आणि बायोटेक्नॉलॉजीची शिक्षण घेणारी ही तरुणी एका ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून दिल्लीच्या नरेला येथील रहिवासी शिवम नावाच्या मुलाच्या संपर्कात आली.
ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात झाले आणि दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते गुरुग्रामच्या सेक्टर-69 मधील एका पीजीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघांच्याही कुटुंबांत त्यांच्या लग्नाची चर्चाही सुरु होती, त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरु आहे असे वाटत होते. मात्र, शिवमच्या मनात घर केलेल्या संशयाने या नात्याचे रुपांतर एका भयानक नरकात केले. तो आपल्या पार्टनरच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला, ज्यातून त्यांच्यात वाद वाढले आणि त्याचे पर्यवसान एका क्रूर हिंसाचारात झाले.
आरोपी शिवमने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत पीडितेला सलग तीन दिवस खोलीत ओलीस ठेवले. पीडितेच्या आईने केलेल्या आरोपांनुसार, या तीन दिवसांत तिच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आले. आरोपीने तिला मारहाण तर केलीच, पण तिला तिची स्वतःची लघवी पिण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर सॅनिटायझर ओतून तिचे गुप्तांग जाळण्याचा अघोरी प्रयत्न केला आणि चाकूने वार करुन तिला जखमी केले. या विकृत मानसिकतेचा कळस म्हणजे, त्याने पीडितेचा नग्न व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
सध्या ही पीडित विद्यार्थिनी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही भयावह वास्तव समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या संपूर्ण मृत्यूच्या सापळ्यातून पीडितेची सुटका तिच्या प्रसंगावधान आणि मातृभाषेमुळे झाली. 18 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा तिला थोड्या वेळासाठी फोन मिळाला, तेव्हा तिने संधी साधून आपल्या आईला कॉल केला. आरोपी शिवम समोरच उभा होता, पण पीडितेने चपळाईने आपली मातृभाषा 'बांगला'मध्ये आईला सर्व आपबीती सांगितली. शिवमला बांगला भाषा समजत नसल्याने तिला काय धोका आहे हे त्याला कळले नाही. पीडितेची आई स्वतः पोलीस अधिकारी असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने गुरुग्राम पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी त्या पीजीवर छापा टाकला, जिथे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आणि विवस्त्र अवस्थेत सापडली. पोलिसांनी शिवमला जागेवरच अटक केली आणि मुलीला तातडीने रुग्णालयात हलवले.
आता पीडितेच्या आईने आरोपीवर बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न यांसारखी कठोर कलमे लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, आपली मुलगी कोणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे याची त्यांना कल्पना नव्हती. गुरुग्राम पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. डीसीपी हितेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि चॅट रेकॉर्ड जप्त केले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून या घटनेने ऑनलाइन मैत्री आणि सुरक्षिततेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.