
नवी दिल्ली: ‘जीएसटी’चे टप्पे चारवरून दोनपर्यंत कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची आजपासून (ता. २२) अंमलबजावणी सुरू होत असून यामुळे दैनंदिन गरजेच्या असंख्य वस्तू स्वस्त होणार आहेत.
जीएसटी कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारा तर आहेच पण या निर्णयामुळे विक्री वाढणार असल्याने कंपन्याही खूश झाल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कर संरचना सुटसुटीत आणि सुलभ करणे, वस्तूंची विक्री वाढविण्यासह सेवा क्षेत्राचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कराचे टप्पे दोनपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. चालू महिन्याच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने या निर्णयाला मंजुरी दिली होती.
घरगुती वापराच्या ज्या वस्तूंवर आधी १२ टक्के कर लावण्यात आला होता, त्या वस्तूंचा समावेश पाच टक्के कराच्या श्रेणीत झाला आहे. या वस्तूंमध्ये टूथपेस्ट, साबण, शाम्पू, बिस्किटे, स्नॅक्स, फळांचा रस, इतर पॅकबंद खाद्यपदार्थ, तूप, पनीर, दूध, दही, कंडेन्स्ड दूध अशी दुग्धोत्पादने, सायकल, स्टेशनरीचे सामान, ठरावीक किमतीचे कपडे, चप्पल आणि बूट यांचा समावेश आहे.
ज्या वस्तूंवर पूर्वी २८ टक्के कर आकारला जात असे, त्या वस्तूंवर आता १८ टक्के कर लागणार आहे. अशा वस्तूंमध्ये एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर, मोठ्या आकाराचे दूरचित्रवाहिनी संच, सिमेंट, १२०० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटरकार, दुचाकी वाहने यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.