Goa Connection of Ranchi Land Scam: झारखंडमधील जमिन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सनदी अधिकारी आयएएस छवी रंजन यांच्या गोवा दौऱ्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. उद्योगपती विष्णू अग्रवाल यांना आज, सोमवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.
त्यांच्याकडूनच रंजन यांच्या गोवा दौऱ्याबाबत चौकशी केली जाणार होती. तथापि, ही चौकशी आज पूर्ण होऊ शकलेली नाही.
विष्णु अग्रवाल यांनीच रंजन यांच्या गोवा दौऱ्याचा सर्व खर्च केल्याचा संशय होता. रंजन हे रांचीचे माजी आयुक्त आहेत. रविवारी या प्रकरणात रंजन यांना ईडीने सहा दिवसांची कोठडी सुनावली होती. रंजन यांनी लष्कराच्या 4.55 एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे.
ईडीने न्यायालयात सांगितले होते की, जमिन हडप करणारी एक टोळी कार्यरत आहे. यात महसूल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच उच्चपदस्थ नोकरशहा आणि राजकारणी देखील सामील आहेत.
ईडीने सोमवारी व्यापारी विष्णू अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडून छवी रंजन याच्या गोवा दौऱ्यासाठी दिलेल्या निधीबाबत चौकशी केली जाणार असे समजले होते. छवी रंजन याच्या गोवा दौऱ्याचा सर्व खर्च उचलण्याची काय गरज होती, याची माहिती ईडी घेणार होती.
तथापि, विष्णू अग्रवाल यांनी ईडीच्या प्रश्नांचा ससेमिरा आज चुकवला. ते सकाळी ईडी कार्यालयात आले, पण सोबत हेल्थ सर्टिफिकेट घेऊनच आले. तब्येत ठीक नसल्याचे त्या सर्टिफिकेटमध्ये म्हटले होते.
त्यामुळे तीन तासाच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. ईडीने त्यांना बरे वाटल्यानंतर चौकशीसाठी या, असे सांगितले आहे. तथापि, चौकशीची नवीन तारीख अद्याप ठरलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.