CM Pramod Sawant in Telangana: काँग्रेस आणि सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) हे पक्ष म्हणजे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, काँग्रेसमधून निवडून आलेले नंतर बीआरएसमध्ये जातील, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
सोमवारी सावंत तेलंगणात भाजपच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी बीआरएस सह काँग्रेसवर टीकास्त्र डागले.
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा स्वतंत्र राज्यासाठी लढा दिला होता. पाणी, पैसा आणि नोकरीच्या संधी या मागण्या लावून धरत त्यांनी स्वतंत्र राज्य मिळवले.
पण या मागण्यांची पूर्तता करण्यात, तेलंगणातील लोकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यात त्यांना आणि भारत राष्ट्र समिती पक्षाला अपयश आले आहे.
अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि बीआरएस हे एकच आहेत. मी म्हणेन की, हो दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार, कमिशनसाठी ओळखला जातो. तर बीआरएस जातीय दंगली भडकवणारा पक्ष आहे.
काँग्रेसमधून विजयी होणारे नेते बीआरएसमध्ये जातील, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी तेलंगणातील जनतेच्या पाणी, विकासासाठीचा पैसा आणि नोकऱ्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपचे डबल इंजिन सरकार निवडून द्या, आणि नवीन भारताप्रमाणे नवीन तेलंगण तयार करा, असे आवाहन केले.
तेलंगणात ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे. तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागा आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.