
फरीदाबाद: फरीदाबादमधून दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घराजवळील खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पल्ला भागातील रोशन नगर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, सासरच्या मंडळींनीच तिचा खून करून ती पळून गेली असे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.
२०२३ मध्ये अरुण सिंह (२८) याच्याशी विवाह झालेल्या तन्नू राजपूत (२५) या तरुणीचा मृतदेह तिच्या सासरच्या तीन मजली घरासमोरील रस्त्यावर सुमारे ८ ते १० फूट खोल खड्डा खणून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असला तरी, तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी तिच्या कपड्यांवरून तिची ओळख पटवली. शुक्रवारी (दि.२०) बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले असून, अहवाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील खेरा गावची मूळ रहिवासी असलेली तन्नू राजपूत, २५ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती अरुण सिंह याने पल्ला पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावेळी त्याने तन्नू ही मानसिकदृष्ट्या कमकुवत असून, आदल्या दिवशी ती अचानक गायब झाल्याचा दावा केला होता. मात्र, तपास अधिकाऱ्यांना नंतर समजले की, हा दावा खुनावर पांघरूण घालण्याचा एक बनाव आहे.
तन्नू बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात तिची माहिती मिळवण्यासाठी तपासकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील तिच्या माहेरच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता, त्यांनी पतीने केलेल्या दाव्यांवर संशय व्यक्त केला. 'तन्नू कोणासोबततरी पळून गेली' यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. उलट, त्यांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींवरच आरोप केला. अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना काही आठवडेपर्यंत तन्नूचा ठावठिकाणा लागला नाही.
शुक्रवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा तिच्या सासरच्या घरी धाव घेतली आणि अरुण सिंहचे वडील भूप सिंह (५०) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, भूप सिंहने तन्नूचा खून करून तिचा मृतदेह रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी जेसीबी मशीन आणून घटनास्थळ खोदले आणि सुमारे ८ ते १० फूट खोल खोदल्यानंतर तन्नू राजपूतचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. "तिच्या अंगावर असलेल्या कपड्यांवरून तिच्या कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली," अशी माहिती पल्ला पोलीस ठाण्याचे एसएचओ, इन्स्पेक्टर सत्य प्रकाश यांनी दिली.
इन्स्पेक्टर प्रकाश यांनी सांगितले की, "तो खड्डा मूळतः एप्रिलमध्ये गटार जोडणीसाठी खोदण्यात आला होता, कारण या भागात पाणी किंवा गटार व्यवस्था नाही.
कुटुंबाने तो वाळूने भरला होता आणि खून केल्यानंतर मृतदेह अंधारात तिथे पुरला. शेजाऱ्यांना या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती." कुटुंबाने नंतर शेजाऱ्यांना सांगितले की तन्नू कदाचित पळून गेली असून, ते तिचा शोध घेत आहेत.
राजपूतचे पालक या आठवड्याच्या सुरुवातीला तपासासाठी फरीदाबादला पोहोचले होते. "पती किंवा सासरची योग्य चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असा त्यांचा आग्रह होता. आम्ही जेव्हा घरी गेलो, तेव्हा केवळ सासरा भूप सिंह उपस्थित होता. आम्ही त्याला चौकशीसाठी आणले आणि त्याच्या कबुलीमुळे प्रकरण उघडकीस आले," असे प्रकाश यांनी सांगितले.
प्राथमिक तपासानुसार, हत्येमागे हुंडा किंवा अनैतिक संबंध हे कारण असू शकते असा पोलिसांना संशय आहे. "तिच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा खून झाल्याचा आरोप केला आहे. ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. "तपास सुरू असून, खुनाचे नेमके कारण आणि वेळ लवकरच निश्चित केले जाईल," असेही त्यांनी सांगितले.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) (खून), ३(५) (सामूहिक हेतू) आणि ६१ (गुन्हेगारी कट) अंतर्गत राजपूतचा पती अरुण सिंह आणि सिंह कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंपनीत काम करणारा अरुण सिंह आणि इतर अनेकजण फरार आहेत. भूप सिंह त्यांच्या घराच्या तळमजल्यावर टेलरिंगचे दुकान चालवतो. या प्रकरणाच्या सखोल तपासाने अधिक सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.