

पणजी: ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी सांतिनेज येथील हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पुत्र रोहित आणि अमित यांनी जेनिफर यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
सकाळी मणिपाल येथून साडेनऊच्या सुमारास आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे पार्थिव त्यांच्या ताळगाव येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सुमारे पाच तास नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी सतत वर्दळ होती.
अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून शिस्तबद्ध रांगेने प्रवेश दिला जात होता. मान्यवरांच्या भेटी लक्षात घेऊन निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहतूक पोलिसांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवासस्थानातील हॉलमध्ये ठेवलेल्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी बाबूश मोन्सेरात आणि रोहित यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सायंकाळी निवासस्थानी मास (प्रार्थना) पार पडली. त्यानंतर पार्थिव सेंट मायकल चर्चमध्ये नेण्यात आले. त्यापूर्वी बाबूश मोन्सेरात यांनी पत्नी जेनिफर यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पार्थिव चर्चकडे नेतानाही त्यांना भावना आवरता आल्या नाहीत.
सेंट मायकल चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्यानंतर जेनिफर मोन्सेरात यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनावर ठेवण्यात आले. हजारोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा सांतिनेज हिंदू स्मशानभूमीकडे रवाना झाली. आपल्यावर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा जेनिफर यांनी व्यक्त केली होती.
स्मशानभूमीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारतर्फे जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरची आदरांजली वाहिली. त्यानंतर पोलिस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. अखेर बाबूश मोन्सेरात तसेच पुत्र रोहित आणि अमित यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारानंतर बाबूश मोन्सेरात आणि रोहित यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मान्यवरांनी वाहिली अखेरची आदरांजली
ताळगाव येथील निवासस्थानी जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, विजयादेवी राणे, मंत्री रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत, रमेश तवडकर, माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल, दाजी साळकर, विजय सरदेसाई, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, क्रुझ सिल्वा, प्रेमेंद्र शेट, दिलायला लोबो, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर, मुख्य सचिव व्ही. कंदवेलू, माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, आवेर्तान फुर्तादो, राजेश पाटणेकर, बाबू आजगावकर, लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव, वालंका आलेमाव, जुझे फिलिप डिसोझा, एलिना साल्ढाणा, दयानंद सोपटे, टोनी फर्नांडिस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, समील वळवईकर, जनार्दन भंडारी, अर्चित नाईक, अजय प्रभुगावकर, उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक, शीतल नाईक, सुरेंद्र फुर्तादो आणि ‘आप’चे वाल्मिकी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यांची उणीव अनेक वर्षे भासेल : बाबूश
सेंट मायकल चर्चमध्ये आयोजित प्रार्थनासभेत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. यावेळी ते भावुक झाले होते. ते म्हणाले, त्या आज प्रत्यक्ष आपल्यात नसल्या तरी त्यांची मूल्ये, त्यांचे प्रेम, त्यांचे हास्य आणि त्यांची जिद्द सदैव स्मरणात राहील. त्यांनी ज्यांच्यावर प्रेम केले, ज्यांची सेवा केली, त्या सर्वांच्या मनात त्यांचे स्थान कायम राहील. आज केवळ आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण ताळगावच्या जनतेला या दुःखाची जाणीव होत आहे. अनेकांनी एक आदरणीय नेत्या, विश्वासू मैत्रीण आणि मनापासून काळजी घेणारी दयाळू व्यक्ती गमावली आहे. त्यांची ही उणीव अनेक वर्षे भासत राहील.
पाच तास अखंड सुरू होते अंत्यदर्शन
जेनिफर यांचे पार्थिव सकाळी ताळगाव येथे निवासस्थानी आणल्यानंतर सुमारे पाच तास नागरिकांसाठी अंत्यदर्शन खुले ठेवण्यात आले. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रांगेत शिस्तबद्ध उभे राहून जेनिफर मोन्सेरात यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले होते.
रमेश तवडकर यांना दु:ख अनावर
जेनिफर मोन्सेरात यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर कला-संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी आपल्या भावनांना वाट माेकळी करून दिली. त्याही परिस्थितीत स्वत:ला सावरत त्यांनी बाबूश आणि रोहित, अमित यांचे सांत्वन केले.
अंतिम दर्शनासाठी लोटला जनसागर
सांतिनेज येथील हिंदू स्मशानभूमीत राज्य सरकारतर्फे जेनिफर मोन्सेरात यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलिस दलाने शासकीय मानवंदना दिली. हजारो नागरिकांच्या साक्षीने पार पडलेल्या या अंत्यसंस्काराने संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.