

एका अज्ञात व्यक्तीचा फोन कॉल तुमच्या मनात एवढी भीती निर्माण करू शकतो का, की तुम्ही कोणताही विचार न करता लाखो रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर कराल? छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर भामट्यांनी एका महिलेला थेट 'क्राइम ब्रांच'च्या नावाचा वापर करून ब्लॅकमेल केले आणि तिच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये उकळले. मात्र, पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत या प्रकरणातील तीन आरोपींना मध्य प्रदेशातून अटक केली आहे.
ही घटना अंबिकापूर येथील अजिरमा भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली. मार्च २०२६ मध्ये या महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने अत्यंत रुबाबदार आवाजात आपण 'क्राइम ब्रांच'चे अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने महिलेला थेट धमकावण्यास सुरुवात केली की, "तुम्ही गुगलवर अश्लील व्हिडिओ पाहिले आहेत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत." या अचानक आलेल्या धमकीमुळे महिला प्रचंड घाबरली. तिचा याच घाबरगुंडीचा फायदा घेत ठगांनी प्रकरण दाबण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. अटकेच्या भीतीने महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ४.५० लाख रुपये ट्रान्सफर केले.
पैसे पाठवल्यानंतर काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ गांधीनगर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते, त्यांचे डिजिटल फूटप्रिंट्स आणि बँक ट्रान्झॅक्शनची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना या टोळीचे लोकेशन मध्य प्रदेशात असल्याचे समजले.
छत्तीसगड पोलिसांनी तात्काळ एक पथक मध्य प्रदेशातील टीकमगढ येथे पाठवले. तेथून पोलिसांनी काशीराम अहिरवार, पन्नालाल यादव आणि अभिलाषा अहिरवार या तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. हा गट लोकांना फोन करून कधी क्राइम ब्रांच तर कधी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा आणि पैसे उकळायचा. कोणतीही सरकारी संस्था फोनवर अशी पैशांची मागणी करत नाही, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.