Coromandel Train Accident: एक असा प्रवास जो शेकडो आयुष्यांचा शेवटचा प्रवास ठरला. ज्यांना इच्छित स्थळी पोहोचायचे होते ते सध्या रुग्णालयात पडून आहेत. ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत शोक व्यक्त केला.
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 900 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासोबतच नुकसान भरपाईही जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर रेल्वेच्या डब्यांच्या आत काय झालं असेल याची कल्पनाही आपण करु शकत नाही. घटनास्थळी सगळीकडे हाहाकार माजला. अपघातानंतर आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, बालासोर रेल्वे अपघातावरुनही राजकारण सुरु झाले आहे. टीएमसी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
टीएमसी नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मोदी सरकार वंदे भारत ट्रेन्स आणि नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकांची प्रशंसा करते, जनतेची दिशाभूल करुन राजकीय समर्थन मिळवण्यासाठी घाईघाईने प्रकल्पांचे उद्घाटन करते.
दुसरीकडे मात्र, सरकार विरोधी पक्षनेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पत्रकार यांची हेरगिरी करण्यासाठी पेगासेससारख्या सॉफ्टवेअरची मदत घेते.'
'नोटबंदी असो, जीएसटी असो, घाईघाईने लॉकडाऊन असो, कठोर शेतीविषयक कायदे असो किंवा अपुरे रेल्वे सुरक्षेचे उपाय असो, गरीब आणि उपेक्षितांना या कायद्यांचा फटका बसतो हे दुःखदायक आहे, असेही त्यांनी लिहिले.
या अपघाताचे दृश्ये हृदय पिळवटून टाकणारी आहेत. लोकांना जीव गमवावा लागला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत.
त्याचबरोबर, जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. या घटनेबद्दल काही वाटत असेल तर रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,' असेही ते पुढे म्हणाले.
त्याचवेळी, सीपीआय खासदार बिनॉय विश्वम यांनी ट्विट केले की, 'सरकारचे (Government) लक्ष केवळ लक्झरी गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.'
दुसरीकडे, सध्या हा अपघात (Accident) कसा झाला, याचा शोध घेण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड? आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताचे कारण सिग्नल बिघाड असल्याचे सांगितले जात असले तरी सत्य काय आहे, हे तपासानंतरच कळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.