

Cockroach Janta Party Instagram followers
नवी दिल्ली: देशाच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या एका नव्या पक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे, ज्याचे नाव आहे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP). भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या कथित 'कॉकरोच' आणि 'परजीवी' विधानाच्या विरोधात हा पक्ष उभा राहिला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्थापनेच्या अवघ्या ५ दिवसांत या पक्षाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलने ९० लाख (९ मिलियन) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. हा आकडा सत्ताधारी भाजपच्या (८७ लाख फॉलोअर्स) पेक्षा जास्त असून काँग्रेसच्या (१.३२ कोटी फॉलोअर्स) जवळ पोहोचत आहे. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा पक्ष प्रस्थापित पक्षांना टक्कर देणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके याने केली आहे. अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. याआधी (२०२० ते २०२३) त्याने आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीममध्ये वॉलंटियर म्हणून काम केले आहे. या पक्षाची घोषणा अत्यंत वेगळी आणि उपरोधिक आहे– ‘सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, लेजी’ (धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी).
१५ मे रोजी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचशी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना अभिजीतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, "जर देशातील सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल?" यावर 'जेन-जी' (Gen-Z) म्हणजेच २५ वर्षांखालील तरुणांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि एका नव्या व्यासपीठाची मागणी केली. यातूनच 'CJP' चा जन्म झाला. मात्र, या वादावर सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण दिले की, "माझी टिप्पणी बेरोजगार तरुणांसाठी नव्हती, तर बनावट पदव्या घेऊन वकिली, मीडिया आणि इतर क्षेत्रात घुसलेल्या 'परजीवी' लोकांसाठी होती."
या पक्षात सामील होण्यासाठी अभिजीतने चार अजब अटी ठेवल्या आहेत: १) व्यक्ती बेरोजगार असावी, २) ती अत्यंत आळशी असावी, ३) तिला सतत ऑनलाईन राहण्याचे व्यसन असावे आणि ४) व्यावसायिक पद्धतीने आपली भडास काढण्याची क्षमता असावी.
या पक्षाने आपला अधिकृत जाहीरनामा (Manifesto) देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये अनेक खळबळजनक मुद्दे आहेत:
निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशाला (CJI) राज्यसभेची जागा दिली जाणार नाही.
वैध मतदान डिलीट केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना 'UAPA' अंतर्गत दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केली जाईल.
संसदेत आणि कॅबिनेटमध्ये महिलांना ३३% ऐवजी थेट ५०% आरक्षण दिले जाईल.
अंबानी आणि अडाणी यांच्या मालकीच्या सर्व मीडिया संस्थांचे परवाने रद्द केले जातील आणि 'गोदी मीडिया'च्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
पक्षांतर करणाऱ्या खासदार किंवा आमदाराला पुढील २० वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यास किंवा सार्वजनिक पद भूषवण्यास बंदी घातली जाईल.
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर अभिजीतने स्पष्ट केले की, प्रस्थापित राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला तरी चालेल, पण 'जेन-जी' तरुणांना या चळवळीत कोणत्याही जुन्या राजकीय पक्षाची सावली नको आहे.
तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरण्याबाबत बोलताना तो म्हणाला, "या आंदोलनाला सुरू होऊन केवळ काही दिवस झाले आहेत. देशातील प्रस्थापित पक्ष तरुणांकडे दुर्लक्ष करतात, म्हणूनच तरुण आमच्या पाठीशी उभे राहत आहेत. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय आम्ही सर्व तरुणांशी चर्चा करूनच घेऊ, घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.