

Dharmendra Pradhan Resignation CJP Demand: कॉकरोच जनता पार्टी आणि मोदी सरकार यांच्यात सुरु असलेले आंदोलन मागे घेण्याबाबत आतापर्यंत दोन वेळा अधिकृत बैठका पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही मुख्य मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. शुक्रवारी सीजेपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा व जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे 2 तास महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये सीजेपीने आपल्या तीन प्रमुख मागण्या लावून धरल्या. बैठकीनंतर सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, सरकारने त्यांच्या दोन मागण्यांवर सकारात्मक विचार दर्शवला, परंतु केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत आज (25 जुलै) मोठा निर्णय अपेक्षित आहे.
तिसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी सीजेपीने सरकारला अत्यंत स्पष्ट आणि कडक संदेश दिला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला नाही, तर सरकारसोबत पुढील चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, असे पक्षाने म्हटले. शनिवारी सकाळी सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) आपली भूमिका मांडताना लिहिले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमची 'नॉन-नेगोशिएबल' (ज्यावर तडजोड होऊ शकत नाही अशी) मागणी आहे. जर सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नसेल, तर पुढील चर्चेचा मार्ग पूर्णपणे बंद होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या चर्चेत मोदी सरकारने आंदोलकांच्या दोन प्रमुख मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. यामध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर किंवा कारवाई न करणे आणि कथित पेपर लीक प्रकरणाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देणे, या दोन प्रस्तावांचा समावेश आहे. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर सरकारने अद्याप कोणताही सकारात्मक संकेत दिलेला नाही. केंद्रीय सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा सरकारच्या अजेंड्यावर नाही. या राजकीय कोंडीमुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.