

Dharmendra Biopic: बॉलीवूडमधील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते, ज्यांना त्यांचे चाहते 'ही-मॅन' म्हणून ओळखत होते, त्या धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानानुसार येणाऱ्या आजारांनी त्रस्त होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 10 दिवसांहून अधिक काळ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
या महान कलाकाराला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत पोहोचत आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांचे आयुष्य एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा कमी नव्हते. धर्मेंद्र यांचे जीवन किती रंगीन आणि खास होते, याची कल्पना त्यांच्या चाहत्यांना आहे. एकेकाळी त्यांना त्यांच्या बायोपिक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. जर त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनला, तर त्यांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारायला आवडेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. जवळपास दशकभरापूर्वी, 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी हसून उत्तर दिले होते, "सलमान खान (Salman Khan)! मला वाटते की, माझ्या बऱ्याच गोष्टी त्याच्याशी जुळतात. तो पडद्यावर माझी भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारु शकतो." धर्मेंद्र यांनी अनेक सार्वजनिक मंचांवर सलमान खानची प्रशंसा करत त्याला आपला अत्यंत जवळचा व्यक्ती म्हणून संबोधले.
यापूर्वी, 2011 मध्ये 'यमला पगला दीवाना' च्या ट्रेलर लाँचिंगवेळीही धर्मेंद्र यांनी सलमान खानचे खूप कौतुक केले होते. ते म्हणाले होते, "मी इंडस्ट्रीतील कोणालाही बोलावले, तर माझ्या कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या सदिच्छेमुळे प्रत्येकजण येईल. सलमान स्वतः खूप चांगला माणूस आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो, तो खरा आणि मनाचा स्वच्छ माणूस आहे."
त्याचवेळी, धर्मेंद्र यांनी सलमान खानशी झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीची एक जुनी आठवणही शेअर केली होती, ज्यामुळे त्यांच्यातील स्नेह अधिक स्पष्ट होते. धर्मेंद्र म्हणाले होते, "एकदा मी एका तलावाजवळ शूटिंग करत होतो, तेव्हा मी पहिल्यांदा सलमानला पाहिले. तो तेव्हाही खूप लाजाळू होता आणि आजही तसाच आहे. एकदा शूटिंगदरम्यान कॅमेरा तलावात पडला. त्याने (सलमानने) एका क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली आणि कॅमेरा बाहेर काढला. त्याचवेळी मला समजले की तो किती बहादूर आणि संवेदनशील माणूस आहे. माणुसकी नसेल, तर बाकी कशालाच काही महत्त्व नसते."
धर्मेंद्र यांच्या रुग्णालयात (Hospital) दाखल झाल्याची बातमी मिळताच सलमान खान सर्वात आधी त्यांना भेटायला पोहोचला होता. आता या महान अभिनेत्याच्या निधनानंतर त्याला अंतिम निरोप देण्यासाठी सलमान पवन हंस स्मशानभूमीत पोहोचला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दु:ख आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलीवूडमधील एका युगाचा अंत झाला. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने ते नेहमीच चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.