

Bihar Rohtas Shocking News: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे गुप्तांग कापून ते चक्क मंदिरात देवाला अर्पण केले. या विचित्र आणि विदारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
ही संतापजनक घटना रोहतास येथील कुसडिहरा गावात घडली. विकास कुमार असे या पीडित तरुणाचे नाव असून त्याचे वय 25 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकासचे त्याच्या पत्नीसोबत काही कारणावरुन जोरदार भांडण झाले होते. या वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्याने गावातीलच एका शिवमंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने धारदार शस्त्राने स्वतःचे गुप्तांग कापून ते देवाच्या चरणी अर्पण केले.
धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवाची प्रार्थना करु लागला. इतकेच नाही, तर गुप्तांग कापल्यानंतर तो स्वतःचा गळाही चिरुन घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचवेळी काही ग्रामस्थांनी त्याला पाहिले आणि तात्काळ त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.
कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकासला तातडीने सासाराम येथील सदर रुग्णालयात (Hospital) नेले. तेथील ट्रामा सेंटरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी वाराणसी येथे पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. मणिराज रंजन यांनी दिलेली माहिती अधिक चिंताजनक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणाने स्वतःचे लिंग पूर्णपणे कापून टाकले आहे. योग्य उपचार मिळाल्यास तो शारीरिकदृष्ट्या बरा होईल, मात्र त्याच्यामध्ये कायमचे नपुंसकत्व येईल. डॉक्टरांच्या मते, आता त्याच्यातील पुरुषत्व पूर्णपणे संपुष्टात आले.
या घटनेमागे काही गंभीर मानसिक कारणे असू शकतात, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. रागाच्या भरात किंवा अतीव मानसिक तणावाखाली येऊन अशा प्रकारचे कृत्य करणे हे मानसिक विकृतीचे लक्षण असल्याचे मानले जाते. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, मात्र विकासच्या या अघोरी कृत्याची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये होत आहे. पत्नीसोबतचा किरकोळ वाटणारा वाद एखाद्या तरुणाला स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करायला कसा प्रवृत्त करु शकतो, याचे हे एक हृदयद्रावक उदाहरण ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.