

Bengaluru College Controversy Muslim Student: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु शहरातून शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. येथील प्रतिष्ठित पीईएस युनिव्हर्सिटीमधील एका प्राध्यापकाने भर वर्गात एका मुस्लिम विद्यार्थ्याला 'दहशतवादी' म्हटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापकाला निलंबित केले. मात्र या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 मार्च रोजी वर्गात अध्यापन सुरु असताना घडली. आरोपी प्राध्यापक मुरलीधर देशपांडे यांनी एका विद्यार्थ्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. सांगण्यात येते की, संबंधित विद्यार्थ्याने वर्गाबाहेर जाण्यासाठी प्राध्यापकांकडे परवानगी मागितली होती. मात्र, या साध्या गोष्टीवरुन प्राध्यापक भडकले आणि त्यांनी रागाच्या भरात विद्यार्थ्याला 'दहशतवादी' संबोधून त्याचा अपमान केला. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकाराचे रेकॉर्डिंग केले, जे नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यावर ओरडताना आणि अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरताना स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ thelogicalindian ने शेअर केला.
या घटनेचे पडसाद उमटताच विविध विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने विद्यापीठ व्यवस्थापनाची भेट घेऊन प्राध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे संकेतही दिले. विद्यार्थ्यांमध्ये (Student) असलेला वाढता रोष पाहून विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पीईएस युनिव्हर्सिटीचे चान्सलर जवाहर दोरेस्वामी यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली.
विद्यापीठाने (University) तंत्रज्ञान पथकाला व्हिडिओची सत्यता तपासण्याचे आदेश दिले असून वर्गातील सीसीटीव्ही फुटेजचीही कसून तपासणी केली जात आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्राध्यापक मुरलीधर देशपांडे यांना निलंबित करण्यात आले आहे. "संस्थेत अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधित प्राध्यापकावर अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांमधील वाढत्या धर्मांध मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.