

बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) २०२५ च्या सुरुवातीलाच क्रिकेट जगताला हादरवणारी एक दुःखद घटना समोर आली आहे. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीपूर्वी अवघ्या काही मिनिटांत ढाका कॅपिटल्सचे साहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जकी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ५९ वर्षीय जकी यांच्या निधनामुळे बांगलादेशच्या क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना २७ डिसेंबर २०२५ रोजी सिलहट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घडली. राजशाही वॉरियर्स आणि ढाका कॅपिटल्स यांच्यातील सामन्यासाठी सराव सत्र सुरू होते. महबूब अली जकी नेहमीप्रमाणे उत्साहाने आपल्या संघाची तयारी करून घेत होते. त्यांनी प्री-मैच ड्रीलमध्ये सहभाग घेतला आणि माध्यमांशी संवादही साधला.
मात्र, सराव संपण्याच्या काही वेळ आधीच ते अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्या अचानक कोसळल्याने संघात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने सीपीआर (CPR) देण्यात आला आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महबूब अली जकी हे केवळ एक प्रशिक्षक नव्हते, तर ते अनेक युवा खेळाडूंचे मार्गदर्शक (मेंटॉर) होते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) गेम डेव्हलपमेंट विभागात त्यांनी वेगवान गोलंदाजीचे विशेष प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाने २०२० मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीची फळी मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, असे बीसीबीने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
ढाका कॅपिटल्स संघाने आपल्या लाडक्या प्रशिक्षकाच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "आमच्या कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याला आम्ही गमावले आहे, ही हानी कधीही भरून न निघणारी आहे," अशी भावना संघाने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली. बीसीबीने त्यांच्या सन्मानार्थ शोक जाहीर केला असून, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.