

Bahraich Violence: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ऑक्टोबर 2024 मध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामुळे मोठी दुर्घटना घडली होती. या हिंसाचारात राम गोपाल मिश्रा नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या अत्यंत गंभीर प्रकरणी न्यायालयाने आता आपला निकाल दिला असून एका दोषीला फाशीची शिक्षा तर उर्वरित नऊ दोषींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर निर्णयामुळे न्यायव्यवस्थेने धार्मिक सलोखा बिघडवून हिंसाचार करणाऱ्यांना कडक संदेश दिला.
मागील वर्षी बहराइच जिल्ह्यातील महराजगंज येथे दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक सुरु असताना दोन गटांमध्ये वाद होऊन हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. याच दरम्यान, हिंसाचारात अडकलेल्या रेहवा मन्सूर येथील रहिवासी असलेले राम गोपाल मिश्रा यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. संपूर्ण तपास आणि पुराव्यांच्या आधारावर हे प्रकरण अप्पर सत्र न्यायाधीश प्रथम पवन कुमार शर्मा यांच्या कोर्टात चालवण्यात आले.
पवन कुमार शर्मा यांच्या कोर्टाने या प्रकरणातील सर्व सबळ पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन कठोर निर्णय दिला. हत्येच्या गुन्ह्यामध्ये सर्व 10 आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आढळल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सरफराझ उर्फ रिंकू याला न्यायालयाने (Court) फाशीची शिक्षा सुनावली. राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येसाठी सरफराझ याला मुख्य जबाबदार धरण्यात आले.
एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान हिंसाचार करुन केलेली ही हत्या अत्यंत निंदनीय होती. न्यायालयाने या प्रकरणात त्वरित आणि कठोर शिक्षा सुनावल्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या आणि धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींना एक कडक संदेश मिळाला. न्यायालयीन निर्णयामुळे राम गोपाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.