
Asia Cup trophy controversy
आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानवर मात करून विक्रमी नवव्यांदा विजेतेपद पटकावले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत आशियाई क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर लगेचच नवा वाद उभा राहिला. भारतीय संघाने ट्रॉफी व पदके स्वीकारण्यास नकार दिल्याने संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
सामना संपल्यानंतर झालेल्या सादरीकरण समारंभात भारताने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास ठाम नकार दिला. नक्वी हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला अणुहल्ल्याची धमकी देणारा नेता म्हणून नक्वी वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे, भारतीय संघाने आधीच स्पष्ट केले होते की त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणे शक्य नाही.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या भूमिकेत सातत्य ठेवत केवळ ट्रॉफीच नाही तर खेळाडूंनी मिळणारी पदके देखील स्वीकारली जाणार नाहीत, असा निर्णय घेतला. यामुळे समारंभात बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भारतीय संघाने स्पष्ट संदेश दिला की, खेळात विजय महत्त्वाचा असला तरी राष्ट्राच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही.
भारताने फक्त ट्रॉफी आणि पदकेच नाकारली नाहीत, तर सलमान अली आगासोबत ट्रॉफी फोटोशूट करण्यासही नकार दिला. त्याआधी, १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यावरून दिसून येते की, या संपूर्ण स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघांमध्ये तणावपूर्ण वातावरण होते.
भारताच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायात तीव्र चर्चा रंगली आहे. काहींनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर काहींनी खेळ आणि राजकारण वेगळे ठेवण्याची मागणी केली. मात्र, भारतीय संघाने आपल्या भूमिकेत कोणतीही माघार घेतली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.