Ajmer police arrested a doctor and his mechanic friend who robbed a bank in Kishangarh brandishing a toy pistol and a fake dynamite box:
खेळण्यातील पिस्तूल आणि बनावट डायनामाइट बॉक्स दाखवून किशनगडमधील राष्ट्रीयीकृत बँकेला लुटणाऱ्या डॉक्टर आणि त्याच्या मेकॅनिक मित्राला अजमेर पोलिसांनी नुकतेच अटक केली.
या दोघांनी कर्ज फेडण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी किशनगडमधील खोडा गणेश रोडवर असलेल्या बँकेवर दरोडा टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी डॉक्टरने बँकेकडून कर्ज घेऊन पाली येथे रुग्णालय उभारले होते, मात्र ते रुग्णालय चालवण्यात अपयशी ठरत होता. तसेच बॅंकेचे हप्तेही थकत होते. त्यामुळे डॉक्टरने हे पाऊल उचलले.
नोकरीसाठी परदेशात गेलेल्या पण तिथे जाऊन कर्ज झाल्याने भारतात परतलेल्या आरोपी मेकॅनिकने डॉक्टरला दरोड्यात मदत केल्याचा आरोप आहे.
अजमेरचे पोलीस अधिकारी चुना राम जाट यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी बँक मॅनेजरने तक्रार केली की, हेल्मेट घातलेले दोन लोक पिस्तुल घेऊन बॅंकेत घुसले आणि त्यांनी डायनामाइटने बँक उडवून देण्याची धमकी दिली. त्यांनी 40 लाख रुपयांची मागणी केली मात्र कॅश काउंटरमधून त्यांना फक्त 3.76 लाख रुपये दिले.
या दरोड्यानंतर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक स्थापन केले आणि 800 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी गंज अजमेर येथील रहिवासी प्रेम सिंग (27) आणि अजमेरच्या सुंदरविलास येथील कमलेश (26) यांना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी सहज आणि झटपट पैसे मिळवण्याची योजना आखली होती.
दरोड्याच्या एक दिवस अगोदर एक आरोपी खोडा गणेश मंदिरात गेला आणि वाटेत त्याला एका दुर्गम ठिकाणी असलेली बँक दिसली. बँकेला लुटण्यासाठी दोघांनी बनावट पिस्तुले खरेदी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.